नागपूर : देशातील प्राणिसंग्रहालयात वन्यप्राण्यांचा कोरोनाची बाधा झाल्याच्या घटनेनंतर आता महाराजबाग प्राणिसंग्रहालयानेही येथील प्राण्यांना संक्रमणापासून वाचविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या अंतर्गत येथील प्राण्यांच्या पिंजऱ्यांचे नियमित सॅनिटायझेशन, स्वच्छता, प्राण्यांची वैद्यकीय तपासणी याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
संक्रमण होऊ नये यासाठी महाराजबाग प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाने उपाययोजना आखल्या आहे. सध्या प्राणिसंग्रहालय बंद असले तरी प्राण्यांच्या व्यवस्थेसाठी कर्मचारी नियमित येत असतात. सॅनिटायझेशन करूनच त्यांना प्रवेश दिला जात आहे. वन्यप्राण्यांना भोजन आणि पाणी देणाऱ्या कर्मचाऱ्यांना आत प्रवेश देतानाच त्यांचे तापमान मोजले जात असते. संक्रमितांच्या संपर्कात कुणी कर्मचारी येऊ नये यासाठी काही कर्मचाऱ्यांची प्राणिसंग्रहालय परिसरातच अस्थायी निवासाची व्यवस्था केली आहे.
...
प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी पौष्टिक खाद्य
येथील प्राणिसंग्रहालयात असणाऱ्या प्राण्यांच्या खानपानाकडे विशेष लक्ष पुरविले जात आहे. मांसाहारी प्राण्यांचा ताजे मांस मिळेल याचे प्रयत्न होत आहेत, तर शाकाहारी प्राण्यांना भोजन देताना पाण्याने स्वच्छ करून दिले जात आहे. या सोबतच काकडी, गाजरदेखील उपलब्ध करून देण्यात येत आहे. महाराजबाग प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी अधिकारी डॉ. सुनील बावस्कर यांनी प्राण्यांसोबत सुरक्षित अंतर राखून सेवा बजावण्याच्या सूचना दिल्या आहेत.
...
पशुसंवर्धन मंत्र्यांची भेट
रविवारी सायंकाळी राज्याचे क्रीडा व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी महाराजबाग प्राणिसंग्रहालयाला भेट देऊन पाहणी केली. प्राणिसंग्रहालयाच्या विकासासाठी प्रस्तावित असलेल्या मास्टर प्लानशी संंबंधित माहिती त्यांनी जाणून घेतली आणि निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. या भेटीप्रसंगी कृषी महाविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. दिनकर जीवतोडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित मोटघरे आदी उपस्थित होते.
...