लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. परंतु तरीसुद्धा नागरिक विनाकारण घराबाहेर पडून आपला जीव धोक्यात घालत आहेत. या नागरिकांचा बंदोबस्त करण्यासाठी शहरातील चौकाचौकात पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. ड्युटीवर असलेल्या पोलिसांनाही कोरोनाचा प्रादुुर्भाव होईल या भीतीने त्यांच्या कुटुंबीयांना चिंता वाटत आहे. परंतु यावर मार्ग काढून पोलिसांना कोरोनाच्या प्रादुर्र्भावापासूून वाचविण्यासाठी ‘सॅनिटायझेशन व्हॅन’ तयार करण्यात आली आहे. व्हॅनमध्ये प्रवेश केल्यानंतर अर्ध्या मिनिटातच अधिकारी, कर्मचारी ‘सॅनिटाईझ’ होत असल्यामुळे पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांची चिंता यामुळे कमी झाली आहे.लॉकडाऊनमध्ये नागरिक घराबाहेर पडू नयेत यासाठी पोलीस महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. पोलीस नागरिकांना जागरुक करून लॉकडाऊनचे पालन करण्याचे आवाहन करीत आहेत. होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांकडे लक्ष पुरविण्यासोबतच त्यांना रुग्णालयात भरती करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत करीत आहेत. शहरात सुरू करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरवरही पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. नाकाबंदीची ठिकाणे आणि महत्त्वाच्या जागी पोलीस शेकडोंच्या संख्येने नागरिकांच्या संपर्कात येतात. कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पोलीस आणि त्यांचे कुटुंबीयातही भीतीचे वातावरण आहे. पोलिसांना ‘सॅनिटाईझ’ करण्याची कोणतीच सुविधा नव्हती. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या निर्देशानुसार शहर पोलिसांच्या मोटर वाहन विभागाने ‘सॅनिटायझेशन व्हॅन’ तयार केली आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सह पोलीस आयुक्त रवींद्र कदम, अप्पर आयुक्त नीलेश भरणे आणि उपायुक्त विक्रम साळी यांनी पाहणी केल्यानंतर शुक्रवारी ‘सॅनिटायझेशन व्हॅन’ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. या व्हॅनमध्ये २०० लिटर क्षमतेची टँक आहे. वाहनाच्या छतावर शॉवर पॅनल लावण्यात आले आहे. शॉवरच्या खाली उभे राहताच २५ ते ३० सेकंदात संबंधित पोलीस ‘सॅनिटाईझ’ होतो. ही व्हॅन पोलीस मुख्यालय, नियंत्रण कक्ष आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे. ड्युटी संपल्यानंतर अधिकारी, कर्मचारी या व्हॅनचा वापर करू शकतात. ‘सॅनिटायझेशन व्हॅन’मुळे पोलीस अधिकारी, कर्मचाºयांच्या कुटुंबीयांची चिंता खूप कमी झाली आहे. पोलीस घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना चिंता वाटत होती. आता पोलीस सॅनिटाईझ झाल्यानंतर घरी जाणार आहेत. लवकरच शहर पोलिसांच्या पाचही झोनमध्ये या व्हॅन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानंतर या व्हॅनचा झोनमध्ये उपयोग होणार आहे.पोलिसांना प्रादुर्भावापासून वाचविण्याचा प्रयत्न‘नागरिकांची सेवा करण्यासोबतच पोलिसांच्या आरोग्याकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे. प्रत्येक पोलीस कर्मचारी त्याच्या कुटुंबाचा प्रमुख आहे. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्याबाबत त्यांच्या कुटुंबीयांना भीती वाटणे साहजिक आहे. पोलिसांना कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचविण्यासाठी ‘सॅनिटायझेशन व्हॅन’ तयार करण्यात आली आहे. ड्युटी संपल्यानंतर घरी जाण्यापूर्वी पोलीस या व्हॅनचा वापर करून सुरक्षित घरी जाऊ शकतील. यासोबतच पोलिसांना मास्क वापरण्यासह सुरक्षेच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या आहेत.’-डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलीस आयुक्त, नागपूर