राजीव सिंह
नागपूर : रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डात आगीच्या अर्धा डझन घटना राज्यातील मोठ्या रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना घडल्या. सुरुवातीला वीज पुरवठ्यामुळे भार वाढल्याने आग लागल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. नंतर बारकाईने अभ्यास केला असता वॉर्डात ऑक्सिजनचा चांगला स्तर आणि सॅनिटायझरचे थेंब बाष्पीभवन होऊन छताला चिपकत असल्याचे लक्षात आले. वीज पुरवठ्याचा भार वाढल्यामुळे ठिणगी पडल्यानंतर तिचे आगीत रूपांतर होण्यास अधिक वेळ लागत नाही. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने याची पुष्टी केली आहे.
अभ्यासातून याबाबतची सत्यस्थिती पुढे आली आहे. आयसीयू वॉर्डात वातानुकूलित सिस्टीम लावलेली असते. येथे रुग्णांची संख्या वाढल्यामुळे भार वाढतो. वीज पुरवठा करणारी व्यवस्था हा भार सहन करीत नाही. आयसीयू वॉर्डात ऑक्सिजनचा पुरवठा निरंतर सुरू असतो. त्यामुळे येथे ऑक्सिजनचा स्तर अधिक राहतो. कोरोना रुग्णांमुळे सॅनिटायझरचा वापरही अधिक होतो. त्यात अल्कोहोल असल्यामुळे वाफ होऊन छताच्या भिंतीला चिपकते. अल्कोहोल आग भडकविण्याचे काम करते. अशा स्थितीत ठिणगी पडल्यास तिचे आगीत रूपांतर होण्यास वेळ लागत नाही. आयसीयूत दाखल असलेले रुग्ण गंभीर असतात. ते हलूही शकत नाही. यामुळे वॉर्डात तैनात कर्मचारी व नर्स यांच्या भरवशावरच त्यांना सुरक्षित बाहेर काढता येऊ शकते. त्यामुळे महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी कोविड रुग्णालयात तैनात कर्मचाऱ्यांना आगीपासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला. अनेक रुग्णालयात मर्यादित सामग्री आहे. त्यामुळे ज्या रुग्णालयात जेवढ्या सुविधा आहेत, त्याच्या भरवशावर तेथील नागरिकांना आगीपासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
..........
कोविड रुग्णालयांना प्रशिक्षणासाठी प्राथमिकता
शहरात ६४२ च्या जवळपास रुग्णालय आहेत. यात १८० च्या जवळपास रुग्णालयांना कोरोनाच्या रुग्णांना भरती करण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोविड रुग्णालयातील कर्मचारी, नर्स व डॉक्टरांना आगीपासून बचाव करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. अग्निशमन विभागाच्या ९ फायर स्टेशनच्या मदतीने त्यांच्या क्षेत्रात येणाऱ्या केंद्रांना आगीपासून बचाव करण्याचे मार्गदर्शन करण्यात येत आहे.
४० कोविड रुग्णालयांचे प्रशिक्षण पूर्ण
मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी सांगितले की, ऑक्सिजनचा चांगला स्तर, सॅनिटायझरचा अधिक वापर आणि वीज पुरवठ्याची जुनी व्यवस्था यामुळे आग लागण्याची शक्यता अधिक असते. यामुळेच कोविड रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ४० रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. उर्वरित १४० रुग्णालयातही प्रशिक्षण लवकरच पूर्ण करण्यात येईल. ज्या रुग्णालयात जेवढ्या सुविधा आहेत, त्या सुविधांच्या भरवशावर आगीपासून बचाव करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणासाठी प्रत्येक फायर स्टेशनमध्ये वेगळी चमू बनविण्यात आली आहे.
...........