लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला अखेर पूर्णवेळ कुलगुरू लाभले आहेत. डॉ. संजय दुधे यांची प्र-कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. दुधे हे तायवाडे कला-वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक असून, शिक्षण मंचातदेखील सक्रिय आहेत.
डॉ. सुभाष चौधरी यांच्याकडे कुलगुरूपदाची सूत्रे आल्यानंतर प्र-कुलगुरूपदी कोण येणार, हा प्रश्न उपस्थित होत होता. यासंदर्भात विविध कयासदेखील लावण्यात येत होते. प्र-कुलगुरू पदासाठी कुलगुरूंनी सक्षम लोकांची नावे राज्यपाल कार्यालयाकडे पाठविली होती. यात डॉ. दुधे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. डॉ. दुधे हे विद्यापीठाच्या विद्वत् परिषदेचे सदस्य आहेत. डॉ. प्रमोद येवले यांच्यानंतर विद्यापीठाला पूर्णवेळ प्र-कुलगुरू लाभलेच नव्हते. या कालावधीत डॉ. विनायक देशपांडे व डॉ. सुभाष चौधरी यांच्याकडे प्रभारी प्र-कुलगुरूपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
निकालांचेच सर्वात मोठे आव्हान
डॉ. दुधे यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान हे परीक्षांच्या निकालांचे राहणार आहे. ऑनलाईननंतर ऑफलाईन परीक्षांचे नियोजन त्याचप्रमाणे पीएचडीची प्रवेश परीक्षा वेळेत घेण्यासाठीदेखील त्यांना पावले उचलावी लागतील. नवीन विद्यापीठ कायद्यानुसार
प्र-कुलगुरूंच्या जबाबदाऱ्या या वाढल्या आहेत. पूर्णवेळ व्यक्ती नसल्याने अनेक कामे संथगतीने सुरू होती. आता त्यांना वेग मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.