कोविड-१९ आजाराच्या पार्श्वभूमीवर बालकांची काळजी व संरक्षणासाठी जिल्हाधिकारी आर. विमला यांनी जिल्हा कृती दलाची बैठक बोलावली होती. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अर्पणा कोल्हे यांनी उपरोक्त माहिती दिली.
कोविडमुळे एक पालक मृत्यू पावलेल्या बालकांची संख्या १३७० असून, त्यापैकी ३८१ बालकांचे सामाजिक तपासणी अहवाल झाले असून, उर्वरित बालकांच्या घरी लवकरात लवकर गृहभेट करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यावेळी संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष राजू थोरात, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अधिकारी प्रतिभा फाटे उपस्थित होते.
ज्या बालकांचे आई-वडील दोघेही कोरोनाने मृत्यू पावले आहेत, त्यांच्या मालमत्तेची नातेवाईक किंवा अन्य कुणी विक्री करू नये म्हणून सहनिबंधक कार्यालयांना पत्र देण्यात यावे. तसेच या बालकांच्या शाळेच्या फीबाबत शिक्षण विभागालाही पत्र देण्यात यावे. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना लाभ देण्यात येणाऱ्या सर्व कायदेशीर अडचणी दूर करण्यासाठी जिल्हा विधिसेवा प्राधिकरणने जलदगतीने कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.