पहिले ‘पोस्टर’, आता ‘एसएमएस’: भाजपच्या अंतर्गत गोटात खळबळ योगेश पांडे नागपूर गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय विजनवासात असलेल्या संजय जोशी यांच्या घरवापसीसाठी झालेल्या ‘पोस्टरबाजी’मुळे भाजपातील अंतर्गत राजकारण तापले होते. परंतु आता या घरवापसी मोहिमेंतर्गत देशभरातील विविध ठिकाणी नागरिकांना ‘एसएमएस’ पाठविण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. संघ परिवाराशी जुळलेल्या काही स्वयंसेवकांकडे हे ‘एसएमएस’ गेले आहेत. या ‘एसएमएस’मागे नेमके कोण आहे याबाबत संभ्रम कायम आहे.संजय जोशी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधक मानण्यात येतात. गुजरात भाजपमध्ये एकेकाळी खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या मोदी व जोशी यांच्यात कालांतराने वितुष्ट आले व यातूनच जोशी हे राजकीय परिघाबाहेर गेले. तीन महिन्यांपूर्वीच नवी दिल्ली व नागपूरसह देशात काही ठिकाणी संजय जोशी यांची ‘घरवापसी कधी’ असे प्रश्न उपस्थित करणारे ‘पोस्टर्स’ लागले होते. मोदी आणि भाजप नेतृत्वावर यातून शरसंधान करण्यात आले होते. यावरून राष्ट्रीय स्तरावर नव्या चर्चेला सुरुवात झाली होती. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचा स्वीय सहायक नितीन सरदारेचा या प्रकरणात राजीनामा घेतला गेलाच शिवाय नाईक यांनाही पक्षश्रेष्ठींकडे या पोस्टरबाजीबाबत खुलासा करावा लागला. हे पोस्टरयुद्ध शांत झाले असे वाटत असतानाच काही दिवसांपूर्वी संजय जोशी यांच्या घरवापसीसंदर्भात ‘एसएमएस’ पाठविण्यात आले. त्यामुळे या वादाचा नवा अंक सुरू झाला आहे.
संजय जोशी यांच्या ‘घरवापसी’साठी मोहीम तीव्र
By admin | Published: July 18, 2015 3:13 AM