लोकमत विशेष, यदु जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: राज्याचे विद्यमान अन्न व औषधी प्रशासन मंत्री संजय राठोड हे भाजप-शिवसेना सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असताना त्यांनी वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील गायरानाची २५ कोटी रुपये किमतीची तब्बल १० एकर जमीन दोन व्यक्तींना वाटप केल्याचे नवे प्रकरण समोर आले.
तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या जमिनीच्या प्रकरणात बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि ही जमीन सरकारजमा करावी असे सुस्पष्ट आदेश दिले होते; पण ते डावलून राठोड यांनी काळी कारंजामधील पाच एकर जमीन ही युनूस अय्युब अन्सारी यांना, तर पाच एकर जमीन ही रोहित राधेश्याम लाहोटी यांना दिली. दोन्ही आदेश त्यांनी एकाच दिवशी म्हणजे ७ ऑगस्ट २०१९ रोजी पारित केले. ‘लोकमत’ने मंगळवारी सावरगावची ५ एकर जमीन खासगी व्यक्तीच्या नावे केल्याचे प्रकरण उघडकीस आणले.
संजय राठोड नॉट रिचेबल
या प्रकरणावर संजय राठोड यांचे दोन्ही मोबाइल स्विच ऑफ होते. मंत्रिमहोदयांची प्रकृती बरी नसल्याचे त्यांचे स्वीय सचिव म्हणाले.
सत्तारांच्या राजीनाम्यावर विरोधकांचे मौन
- बेकायदा जमीन वाटपप्रकरणी सोमवारी कामकाज रोखून धरणाऱ्या विरोधकांनी मंगळवारी मात्र या मुद्द्यावर मौन बाळगल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
- कृषिमंत्री अब्दुल सत्तार सभागृहात असूनही विरोधी पक्षाने त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीला स्पर्श केला नाही. सत्तापक्ष आणि विरोधक यांच्यात या विषयावर काही समझौता तर झाला नाही ना, अशी चर्चाही विधानभवन परिसरात रंगली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"