नागपूर/मुंबई - खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार व्यक्त केल्यापासून शिवसैनिकांनीही जोरदार तयारी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. आता सकाळी ९ वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन राणा दाम्पत्याने स्पष्ट केले. त्यानंतर शिवसैनिक संतप्त झाले असून आज सकाळपासूनच राणा कुटुंबीयांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर गर्दी केली आहे. येथे शिवसैनिक आक्रमक झाले असून जोरदार घोषणाबाजीही सुरू आहे. याप्रकरणी बोलताना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
सरकार आमचं असल्याने आमचे हात बांधले आहेत. माझं आत्ताच मुख्यंत्र्यांशी बोलणं झालं आहे. राष्ट्रपती राजवट लावण्याची धमकी आम्हाला देऊ नका, ईडी, सीबीआय असल्या धमक्यांना शिवसेना घाबरत नाहीत. बायकांना पुढे करुन शिकंड्याचा खेळ भाजपा करतंय, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, राणा दाम्पत्याने लायकीत राहावे, कोण आहात तुम्ही. तुम्ही आमच्या घरात शिरताय, मग शिवसैनिक कसा गप्प बसेल. शिवसैनिकांचा हा उत्स्फुर्त प्रतिसाद आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
तुम्हालाही घरे आहेत हे लक्षात ठेवा
कायदा आणि सुव्यवस्थे बाबात उपयोजन करण्यासाठी तुमचे सल्ले ऐकण्याइतकं महाराष्ट्राला भिकारीपण आलं नाही. मातोश्रीत घुसण्याची हिम्मत नाही, ते बदनामी करत आहेत. मग, शिवसैनीक चिडून तुमच्या घरांपर्यंत शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल, तर तुम्हालाही घरं आहेत हे लक्षात ठेवा, असा इशाराच राऊत यांनी दिला. शिवसैनिकांवर आता कुणाचंही कंट्रोल नाही, अजून काही सुरुवात झाली नाही. दोन दिवसांत मुंबईत जे काही झाली तो फक्त शिवसैनिकांच्या भावनेचा उद्रेक नाही, सामान्य भावनेचाही उद्रेक आह, असे म्हणत संजय राऊत यांनी शिवसैनिकांच्या आक्रमकतेचं समर्थन केलं आहे.
भाजपचं त्यांना मोठं करतंय
राणा यांना मोठं आम्ही करत नाही. कालपर्यंत हिंदूत्वावर हल्ले करणारे हे बंटी आणि बबली आहे यांना भाजप किंवा आता नव हिंदूत्ववादी औवैसी आलेय ते यांना मोठं करतायत. त्यांचेच हात जळणार आहेत. हनुमान चालीसा आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही वाचू, बाहेरचे व्यक्ती येऊन शिकवणार का, असा सवालही राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी येथील शिवसैनिकांची भेट घेतली. तर, तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांनीही मध्यरात्री शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यानंतर, आज सकाळपासूनच शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.