नागपूर : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्यावर परत एकदा टीकास्त्र सोडले आहे. संजय राऊत यांना कुठल्याही पद्धतीची धमकी आलेली नाही. संजय राऊत यांच्या डोक्यावर विविध प्रकरणांत कारवाईची टांगती तलवार आहे. ते कोणत्या प्रकरणात आत जातील हे लवकरच कळेल. ते कुठलेही क्रांतिवीर नाहीत, या शब्दांत राणे यांनी राऊत यांच्यावर टीका केली. शुक्रवारी नागपुरात आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शरद पवारांचे विचार काही पटत नसतील तरी महाराष्ट्रात कोणालाही त्रास होणार नाही, इतकी काळजी गृहमंत्री निश्चितच घेतील. जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली होती. शरद पवारांची काळजी घेण्याची जबाबदारी आमच्या सरकारची आहे. संजय राऊत यांना धमकी देण्याची काहीच गरज नाही. मुळात मुंबईतील एका महिला डॉक्टरला संजय राऊत यांनी अनेकदा धमक्या दिल्या. आता तिच्याकडूनच राऊत यांना धमक्या आल्या तर नाही ना याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे, असे राणे म्हणाले.