नागपूर : शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) नेते खा.संजय राऊत यांच्या गुजरातमधून धमकीचे फोन आल्याच्या आरोपांवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमिका मांडली आहे. जर त्यांना धमक्या आल्या आहेत, तर त्यांनी पोलिसांना माहिती द्यायला हवी. मात्र राऊत सकाळी प्रसारमाध्यमांसमोर येऊन वाह्यात भाषा वापरतात. ते कारागृहात कैद्यांची शिवराळ भाषा शिकले व तशीच भाषा प्रसारमाध्यमांसमोर वापरत आहेत, असा आरोप बावनकुळे यांनी लावला.
नागपुरात गुरुवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय राऊत हे वारंवार खोट बोलतात. जर त्यांना धमकीचे फोन आले तर त्यांनी पोलिसांत तक्रार करायला हवी. ते प्रसारमाध्यमांना का सांगतात. त्यांनी सरकारला अतिरिक्त पोलीस संरक्षण मागितले तर नक्कीच ते त्यांना मिळेल. मात्र ते इतके बोलतात की त्याला त्यांचे आमदार व खासदारदेखील कंटाळले आहेत. शिवीगाळ करत व्यक्तिगत टीका करणे त्यांना शोभत नाही, असे बावनकुळे म्हणाले.
राहुल गांधी कधीच नेतृत्व करु शकत नाहीत, त्यासाठी मोदींसारखं...; बावनकुळेंनी सांगितला फरक!
लोढा यांची तुलना अयोग्यच
शिवरायांची तुलना मुख्यमंत्र्यांशी केल्यामुळे भाजपचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर टीका झाली. त्यांनी अशी तुलना करणे योग्य नव्हते असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. शिवरायांबाबत कुणीही अयोग्य वक्तव्य करायला नकोत असेदेखील ते म्हणाले. महाविकासआघाडीच्या नेत्यांनीदेखील अडीच वर्षांच्या कार्यकाळात अनेक महापुरुषांचा अपमान केला. आम्ही ते मुद्दे उकरून काढणार नाहीत. मात्र राजकारण्यांनी विकासाच्या मुद्द्यांवर जास्त भर दिला पाहिजे, असे बावनकुळे यांनी प्रतिपादन केले.