नागपूर : आर्थिक देवाणघेवाणीचे आरोप असलेले उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. महेश कुमार साळुंखे हे वैद्यकीय रजेवर असल्याने त्यांचा प्रभार शासकीय न्याय साहाय्यक विज्ञान संस्थेचे प्राध्यापक डॉ. संजय ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. डॉ. साळुंखे यांच्याविरोधात चौकशी सुरू असून, त्याचा अहवाल अद्यापपर्यंत आलेला नाही. ते रजेवर गेले आहेत की जाणूनबुजून रजेवर पाठविण्यात आले आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
डॉ. महेशकुमार साळुंखे हे स्थाननिश्चितीसह विविध कामांसाठी प्राध्यापकांसोबत मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण करीत असल्याचा आरोप फुले, शाहू, आंबेडकर अध्यापक परिषदेने केला होता. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडेदेखील या तक्रारी गेल्या होत्या. नागपूर दौऱ्यादरम्यान उदय सामंत यांनी साळुंखे यांची चौकशी करण्याची घोषणा केली होती. ते पदावर राहिल्यास चौकशीत हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे. तसेच चौकशी समितीवर शिक्षक, शिक्षकेत्तर व व्यवस्थापन प्रतिनिधी नेमावा, अशी मागणीही ‘युनिव्हर्सिटी प्रोफेसर्स असोसिएशन’तर्फे करण्यात आली होती.
शुक्रवारी संचालक डॉ. धनराज माने यांनी पत्र काढत डॉ. साळुंखे वैद्यकीय कारणास्तव रजेवर असल्याने डॉ. ठाकरे यांच्याकडे प्रभार राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर शैक्षणिक वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. यासंदर्भात डॉ. साळुंखे यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.