नागपूर : नागपूरची वाटचाल स्मार्ट सिटी म्हणून होत आहे. नागपूरकरांना विविध सोयीसुविधा उपलब्ध होत आहेत. परंतु पूर्व नागपुरातील संजयनगरातील नागरिकांना मात्र मूलभूत समस्यांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. या भागात नागरिकांना रस्ते, पाणी, उद्यान आदी समस्यांसाठी लढा द्यावा लागत आहे. महापालिकेने आपल्या समस्या सोडविण्याची मागणी ते करीत आहेत.
गटारलाईनमुळे नागरिक त्रस्त
संजयनगरात नागरिक गटारलाईनच्या समस्येमुळे त्रस्त झाले आहेत. या भागात वारंवार गटारलाईन चोक होत असल्यामुळे दुर्गंधी पसरते. गटारलाईन चोक झाल्यामुळे नागरिकांच्या घरात घाण पाणी साचते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होऊन नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. महापालिकेने या भागातील गटारलाईनची सफाई करण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
नागरिकांची पाण्यासाठी भटकंती
नळाला अपुरे पाणी मिळत असल्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणीही मिळत नाही. वापरण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. त्यामुळे महापालिकेने या भागात उच्चदाबाने पाणीपुरवठा करण्याची नागरिकांची मागणी आहे. या भागातील कूपनलिकाही बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बंद असलेल्या कूपनलिका सुरू केल्यास नागरिकांची पाण्यासाठी होत असलेली भटकंती थांबू शकते.
खराब रस्त्यामुळे वाढले अपघात
संजयनगर भागातील अंतर्गत रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. गिट्टी उखडलेली असल्यामुळे वाहन चालविताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यात पावसाळ्यात पाणी साचते. त्यामुळे खड्डा दिसत नसून वाहनचालक खाली पडतात. त्यामुळे या भागातील रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. याशिवाय या भागात फूटपाथ नसल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून पायदळ चालावे लागते. महापालिकेने या भागात फूटपाथ तयार करण्याची गरज आहे.
स्वच्छतेचा अभाव
परिसरात सफाई कर्मचारी येत नसल्यामुळे सर्वत्र कचरा साचलेला दिसतो. काही नागरिक आपल्या घराजवळील कचरा झाडतात. परंतु या भागात अनेक ठिकाणी कचरा साचलेला दिसतो. त्यामुळे महानगरपालिकेने या भागात सफाई कर्मचारी नियमित पाठविण्याची मागणी होत आहे. या भागात लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. मुले रस्त्यावर खेळत असल्यामुळे अपघात होत आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने या भागात गार्डनची सुविधा उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी आहे.
गटारलाईनची देखभाल व्हावी
‘गटारलाईन वारंवार चोक होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेने या भागात गटारलाईनची नियमित देखभाल करण्याची मागणी आहे.’
- देवीदास रिनके, नागरिक
दररोज सफाई व्हावी
‘सफाई कर्मचारी नियमित येत नसल्यामुळे या भागात सर्वत्र कचरा साचलेला असतो. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे सफाई कर्मचारी नियमित येण्याची गरज आहे.’
- बंडू प्रधान, नागरिक
कूपनलिका दुरुस्त कराव्यात
‘या भागातील बहुतांश कूपनलिका बंद आहेत. नळालाही अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे या भागातील कूपनलिका दुरुस्त केल्यास नागरिकांना दिलासा मिळेल.’
- साबरा बानो, महिला
रस्त्याची डागडुजी महत्त्वाची
‘परिसरात रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. महापालिकेने या भागातील रस्त्याची डागडुजी करण्याची नागरिकांची मागणी आहे.’
- गोविंद पवार, नागरिक
उद्यानाची व्यवस्था हवी
‘लहान मुलांना उद्यान नसल्यामुळे ते रस्त्यावर खेळतात. त्यामुळे महापालिकेने या भागात लहान मुलांसाठी उद्यानाची सुविधा उपलब्ध करून लहान मुलांची होत असलेली गैरसोय दूर करावी.’
- शे. एजाज, नागरिक
फूटपाथ नसल्यामुळे गैरसोय
‘संजय गांधीनगरात फूटपाथ नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. पायदळ चालणारे नागरिक फूटपाथ नसल्यामुळे रस्त्यावरून चालत असल्यामुळे अपघात होत आहेत. त्यामुळे या भागात फूटपाथची व्यवस्था करण्याची गरज आहे.’
- शांताबाई चिंचुरकर, महिला
.............