लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्राचे राज्यपाल व राज्याच्या विद्यापीठांचे कुलपती विद्यासागर राव यांनी प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. संजीव चौधरी यांची महाराष्ट्र आरोग्यविज्ञानविद्यापीठ, नाशिकच्या व्यवस्थापन मंडळावर नियुक्ती केली आहे. वैद्यकीय क्षेत्रात उच्च दर्जाचा हा सन्मान असल्याचे मानले जाते.डॉ. चौधरी यांनी अस्थिरोग विभागात भरीव कामगिरी केली आहे. भारतात पन्नासीवरील महिलांची हाडे ठिसूळ करून कर्दनकाळ ठरणारा ‘ऑस्टिओपोरोसिस’ या आजाराच्या जनजागृतीसाठी त्यांनी ‘हीटको’ (हेल्थ एज्युकेशन अॅण्ड टेलिकन्सल्टेशन ऑन ऑस्टीओपोरोसिस) हा अभिनव प्रकल्प हाती घेतला आहे. संगणक व व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ग्रामीण भागातील महिलांना या आजाराची माहिती देऊन त्यावरील उपाययोजनांबाबत मागदर्शन करीत आजाराशी लढण्यास ते सशक्त करीत आहेत. त्यांनी निवडलेल्या ११७ गावांपैकी आतापर्यंत ५२ गावांमध्ये हा प्रकल्प यशस्वीरीत्या राबविण्यात आला आहे. स्त्री सशक्तीकरणाचा हा नाविन्यपूर्ण व प्रभावी उपाय जगभरात प्रशंसनीय ठरला आहे.डॉ. चौधरी यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नेपाळ येथे ‘ग्लोबल हेल्थ क्रसेडर ऑफ इयर’ या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते विदर्भ ऑर्थाेपेडिक असोसिएशनचे अध्यक्ष होते. यादरम्यान त्यांनी विदर्भातील नऊ जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या व्यवसायातील महिलांमध्ये ‘ऑस्टीओपोरोसिस’ या आजाराच्या प्रमाणाचा सखोल अभ्यास केला. त्यावर आधारित ‘श्वेत पत्रिका’ भारत सरकारला सुपूर्द करून आजाराच्या वाढत्या प्रमाणाकडे लक्ष वेधले. गांग्झाऊ चीन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑस्टीओपोरोसिसच्या संमेलनात ‘भारतीय पर्यावरण व ऑस्टीओपोरोसिस’ या त्यांच्या शोधप्रबंधाला प्रथम पुरस्कारही मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. चौधरी हे ‘पॅराप्लेजिया’ या आजाराने पीडित रुग्णांच्या पुनर्वसनाकरिता अविरत कार्य करीत आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या ‘ऑस्कर’ संघटनेमधून कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कंबरदुखी व पाठदुखीवर प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजनेवर कार्यशाळा घेतल्या आहेत. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अवॉर्ड व समाजभूषण पुरस्कारानेदेखील डॉ. चौधरी यांना सन्मानित करण्यात आले आहे.
संजीव चौधरी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 11:02 PM