लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्याच्या आरोग्य संचालकपदी नागपूरचे डॉ. संजीव कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूरला दुसऱ्यांदा हा बहुमान मिळाला आहे. डॉ. कांबळे यांच्या नियुक्तीने उपराजधानीतील वैद्यकीय क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, आरोग्य सेविकेचा मुलगा आणि आतापर्यंत आरोग्य सेवेत भरीव योगदान दिल्याने राज्याची आरोग्य विभागाची विस्कटलेली घडी बसविण्यात त्यांना यश येईल, असे बोलले जात आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालकपदाचा निकाल गुरुवारी जाहीर केला. त्यात डॉ. संजीव कांबळे यांना सर्वाधिक गुण मिळाल्याने त्यांची आरोग्य संचालक करण्याबाबतची शिफारस शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार गुरुवारी त्यांना संचालक पदी नियुक्त करण्याचे पत्र मिळाले. सोमवारी ते या पदाची सूत्रे स्वीकारणार आहे.नागपूरच्या माधवनगर येथील रहिवासी असलेले डॉ. संजीव कांबळे यांच्या आई प्रभा कांबळे आरोग्य सेविका होत्या. त्यांनी नागपूर जिल्ह्यातील गुमथळा आणि कळमेश्वरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर त्यांच्या कार्यकाळात आरोग्य सेवा दिली आहे, तर संजीव यांचे वडील हे पोस्ट खात्यात लिपिक होते. प्रभा कांबळे यांनी गरिबांच्या वेदना जवळून बघितल्या. त्यावरून त्यांनी गरिबांना वैद्यकीय सेवा मिळाव्या म्हणून आपल्या मुलाला (संजीव) डॉक्टर करण्याचे निश्चित केले. मुलाला वैद्यकीय शिक्षणाच्या दरम्यान त्यांनी पूर्ण मदत केली. डॉ. संजीव कांबळे यांनीही आईच्या विश्वासाला सार्थ ठरवत वैद्यकीय शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. मेडिकलमधून एमबीबीएस व नंतर रोगप्रतिबंधक औषधवैद्यकशास्त्र विषयात ‘एमडी’ची पदवी घेतल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधून ते अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून नागपुरात त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर नागपूर जिल्हा क्षयरोग अधिकारी, नाशिक येथे आरोग्य सहसंचालक, ठाण्यात जिल्हा आरोग्य अधिकारी ते उपसंचालक आणि २०१५ पासून पुणे येथे सहसंचालक कुष्ठरोग या पदावर कार्यरत होते. नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आरोग्य संचालकपदाची जाहिरात काढल्याने त्यांनीही अर्ज भरत मुलाखत दिली. यात त्यांना सर्वोच्च गुण मिळाले. सोमवारी ते राज्याच्या आरोग्य विभागाच्या संचालक पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. डॉ. कांबळे यांचे आजपर्यंत ३२ राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर शोध प्रबंध प्रसिद्ध झाले आहेत, तर त्यांची आरोग्यविषयक तब्बल ११ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. संचालकपदाचा बहुमान या पूर्वी नागपूरच्या डॉ. मालती चंद्रिकापुरे यांना मिळाला होता.
नागपूरचे संजीव कांबळे राज्याचे आरोग्य संचालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 1:09 AM
राज्याच्या आरोग्य संचालकपदी नागपूरचे डॉ. संजीव कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूरला दुसऱ्यांदा हा बहुमान मिळाला आहे. डॉ. कांबळे यांच्या नियुक्तीने उपराजधानीतील वैद्यकीय क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, आरोग्य सेविकेचा मुलगा आणि आतापर्यंत आरोग्य सेवेत भरीव योगदान दिल्याने राज्याची आरोग्य विभागाची विस्कटलेली घडी बसविण्यात त्यांना यश येईल, असे बोलले जात आहे.
ठळक मुद्देआरोग्य सेविकेच्या मुलाने गाठले शिखर : दुसऱ्यांदा मिळाला नागपूरला बहुमान