दूध डेअरीत होणार आधुनिक प्रयोगशाळा :पालकमंत्री बावनकुळे यांची माहिती नागपूर : नागपूरची बंद पडलेली शासकीय दूध डेअरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने व प्रयत्नाने पुन्हा सुरू होत आहे. या डेअरीत आता दुधावर प्रक्रिया करणारी अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात झालेल्या आढावा बैठकीत दूध डेअरी संस्थातील समस्यांचा आढावा घेण्यात आला. नागपूरची दूध डेअरी विविध कारणांनी बंद पडली. आता या डेअरीचे नूतनीकरण करण्यात येईल व राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ संचालित मदर डेअरी फ्रूट अॅण्ड व्हेजिटेबल कंपनीला नाममात्र दराने भाडे तत्त्वावर देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. विदर्भात दूध उत्पादन वाढावे. तसेच शेतकऱ्यांना जोडधंदा उपलब्ध व्हावा आणि पाळीव पशुधनाला अधिक भाव मिळून शेतकऱ्यांच्या दुधालाही भाव मिळावा या उद्देशाने या डेअरीला नवसंजीवनी देण्यात येणार आहे. शेतकीरी आत्महत्या असलेल्या विदर्भात व मराठवाड्यात या डेअरीमुळे दिलासा मिळेल.या निर्णयानुसार शासकीय दूध योजना मदर डेअरीला हस्तांतरित करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पुढील पाच वर्षांत दोन हजार गावातील ७५ हजार दुग्ध व्यावसायिक कुटुंबीयांना रोजगार उपलब्ध होणार आहे. ही डेअरी ३.५ लाख लिटर दूध संकलन करेल, अशी अपेक्षा आहे. तसेच दोन हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. देशी दुधाळू गायींना पोषक अन्न देऊन त्यांच्यापासून मिळणाऱ्या दुधात वाढ व्हावी असे प्रयत्न केले जातील. तसेच विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कर्ज व नापिकीमुळे होत असलेल्या आत्महत्या थांबविण्यासाठी या गायी शेतकऱ्यांना देऊन त्यांना आर्थिक दृष्टीने सक्षम करण्याचा प्रयत्न आहे, असेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
नागपूरच्या दूध डेअरीला संजीवनी
By admin | Published: February 20, 2016 3:32 AM