जनमंचच्या जेनेरिक औषध दुकानाचे उद्घाटननागपूर : ज्या ब्रॅण्डेड औषधांसाठी पूर्वी हजारो रु पये खर्च व्हायचे, त्याच औषधांसाठी होणारा खर्च शे-पाचशेवर आला होता. तो मध्य भारतातील पहिल्या जनमंचच्या जेनेरिक औषेधांच्या दुकानांमुळे. गरिबांसाठी जणू प्राण वाचविणारी ही ‘संजीवनी’च ठरली. सर्वसामान्यांना जगण्याची पुन्हा एकदा उमेद मिळाली होती. परंतु ऐन दिवाळीच्या तोंडावर दुकानाला आग लागली. सात लाखांचे औषधांसह इतर साहित्य भस्मसात झाले. मात्र, या राखेतून जनमंचने पुन्हा उभे राहण्याची जिद्द दाखविली. न डगमगता, न खचता पुढे जाण्याची ऊर्मी दाखवत आठवडाभरात जेनेरिक औषधाचे दुकान उभे केले. आज सोमवारी सायंकाळी या दुकानाचे पुन्हा उद्घाटन झाले. तेही एका सामान्य वयोवृद्ध नेहमीच्या ग्राहकाकडून.धरमपेठ झेंडा चौकातील या जनमंच जेनेरिक दुकानाच्या उद्घाटनाच्यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. पिनाक दंदे होते. प्रमुख पाहुणे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, उद्घाटक म्हणून अनसूयाबाई जाधव तर मंचावर जनमंचचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर, महासचिव राजू जगताप उपस्थित होते. जनमंचचा हा लोकोपयोगी पुढाकार २०१३ मध्ये सुरू झाला. जेनेरिक औषधे स्वस्त असतातच, पण ती गुणवत्तेत आणि परिणामकारकतेत जराही कमी नसतात. यामुळे ग्राहकांची गर्दी वाढू लागली. या सेवेतून खऱ्या अर्थाने गरिबांची-मध्यमवर्गांची सेवा घडू लागली. दुकानाला आग लागली तरी या सेवेत खंड पडला नाही, असा आवर्जून उल्लेख अॅड. किलोर यांनी आपल्या प्रास्ताविकेतून केला. ते म्हणाले, दुकानात आलेल्या ग्राहकांकडून त्यांच्या औषधांची यादी घेऊन सायंकाळी ती औषधे उपलब्ध करून दिली जात होती. यामुळे ही सेवा अखंडित होती. जेनेरिक औषधाचे हे दुकान पुन्हा सुरू करण्यासाठी लोकांनीच मदत केली. यामुळे आता हे दुकान खऱ्या अर्थाने लोकांचे झाले आहे, असे म्हणत मदत करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. विष्णू मनोहर म्हणाले, हे दुकान गरीब गरजूंसाठी अक्षरश: संजीवनी बनून धावून आले. परंतु जेव्हा दुर्दैवी घटना घडली तेव्हा जनमंच ही संघटना तीळमात्रही खचली नाही. रात्रंदिवस मेहनत घेऊन हे दुकान पुन्हा उभे केले. औषधांची आरोग्य सेवा पुन्हा एकदा सुरू झाली आहे, असे म्हणत त्यांनी जनमंचच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. दंदे म्हणाले, अन्न-वस्त्र-निवाऱ्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आरोग्याचा. या वाढत्या महागाईच्या काळात अनेक नागरिक परवडत नाहीत म्हणून औषधे न घेताच रोग आणि आजार सहन करतात. यामुळे अनेकांचा अकाली मृत्यू होतो. अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी जनमंचचे हे दुकान संजीवनी ठरले आहे. औषधांच्या बाबतीत इतकी विदारक परिस्थिती असताना सामान्यांना स्वस्तात औषधे उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम असाच अखंडित सुरू राहावा, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली. आभारप्रदर्शन राजू जगताप यांनी केले.जेनेरिक दुकानाला पुन्हा उभे करण्यासाठी ज्यांचे सहकार्य मिळाले त्या सर्वांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला. यात माजी नगरसेवक बाबा मैंद, बुलडाणा येथील विष्णुपंत धोटे महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश कन्हेरे, औषध सप्लायर अशोक अग्रवाल, गुप्ता, रंगलानी, आहुजा, दिलीपभाई, श्रीधर आर्ट्सचे श्रीधर उगले, भारद्वाज, तामस्कर, दवे आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)
ती ‘संजीवनी’ पुन्हा सुरू
By admin | Published: October 28, 2014 12:26 AM