लोकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : विदर्भात चित्रपटनगरी उभारण्याचे स्वप्न बऱ्याच काळापासूनचे आहे. मात्र, त्याचा मुहूर्त अद्याप साधलेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर शनिवारी प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त याने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह धावती भेट घेत रामटेक-खिंडसी परिसराची पाहणी केली. अचानक घेतलेल्या या भेटीमुळे विदर्भात चित्रपटनगरी उभारली जाण्याच्या स्वप्नांना बळ मिळाले आहे.
विदर्भ हा निसर्गसंपन्न प्रदेश आहे. पायाभूत सुविधांच्या रचनाही गेल्या काही वर्षांत जाेमाने आकारास येत आहेत. सिमेंट रस्ते, मेट्रो, थेट मुंबईला जोडलेला समृद्धी महामार्ग, उभी होत असलेली मोठमोठी हॉटेल्स, हॉस्पिटॅलिटी सुविधा यासोबतच नद्या, विस्तीर्ण जंगल, टेकड्या, लहान-मोठे धबधबे, जलाशये, ऐतिहासिक स्थळे-वास्तू नागपूरसह विदर्भात मोठ्या प्रमाणात आहेत. येथील विकासासोबतच निसर्गवैविध्याची भुरळ चित्रपट उद्योगाला पडली आहे. या भागात आतापर्यंत कोणताही उद्योग नसल्याने, हा भाग मागासलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर विदर्भात रामटेक येथे चित्रपटनगरी उभारली जावी, यासाठी पालकमंत्री नितीन राऊत प्रयत्नरत असल्याचे दिसून येते. चित्रपट उद्योगासाठी साधारणत: ४०० एकर जागेची गरज बघता, नितीन राऊत यांनी जागेचे निरीक्षण करण्यासाठी अभिनेता संजय दत्त यांच्यासह रामटेक येथील खिंडसी परिसरातील पंचाळा मार्गाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत उदयसिंग यादव होते.
गाळपेर येथील जागेचाही होणार विचार
या भेटीत पंचाळा मार्गावर अपेक्षित आकाराची जमीन उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. तेव्हा उदयसिंग यादव यांनी खिडसीच्या मागे असलेली गाळपेराची सिंचन विभागाची जमीन चित्रपट उद्योगासाठी उपयुक्त ठरेल, असे सुचविले. पालकमंत्र्यांनी तत्काळ या जमिनीविषयी माहिती उपलब्ध करवून देण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या.
पुढच्या भेटीत विस्ताराने बोलण्याचे आश्वासन
संजय दत्तला फुप्फुसाचा कर्करोग असल्याचे निदान झाल्यानंतर आणि उपचार सुरू असतानाच, ही त्याची नागपूरला सलग दुसरी भेट असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याच वर्षी काही महिन्यांपूर्वी त्याने नागपूरला नितीन गडकरी आणि नितीन राऊत यांच्या घरी भेट दिली होती. संजय दत्त याचे स्वत:चे प्रॉडक्शन हाउस असून, तो त्याच्या विस्ताराच्या हेतूने नागपूरला फिल्म सिटी उभारणीच्या कार्यात उत्सुक असल्याचे सांगितले जात आहे. आज नागपूरला आला असता त्याने पत्रकारांशी संवाद साधण्याचे टाळले. मात्र, पुढच्या भेटीत विस्तारित बोलण्याचे आश्वासन विमानतळावर दिले, हे विशेष. तत्पूर्वी संजय दत्तने गोरेवाडालाही भेट देऊन पाहणी केली.
..............