Sushma Andhare ( Marathi News ) : नागपुरात रविवारी रात्री एका ऑडी कारने भरधाव वेगात दोन अन्य कार आणि एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातातील कार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची असल्याची माहिती समोर आली आहे, या प्रकरणी आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पोलिसांना प्रश्न उपस्थित केले आहेत.
"जोपर्यंत भाजप आहे, तोपर्यंत...", राहुल गांधींच्या विधानानंतर अमित शाहांची संतप्त पोस्ट
नागपुरात आज ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले. "मी पोलिस अधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारले होते, तेव्हा त्यांनी तपास सुरू असल्याचं सांगितलं आहे. आता त्यांचा तपास सुरू असेल आणि त्यांना कार कोणाची आहे? माणूस कोण होता हे कळालं असेल तर तुम्ही सेक्शन वाढवत का नाही? तुम्ही आणखी एक आरोपी वाढवत का नाही? यावर ते मौन आहेत. स्वाभाविक आहे. कदाचित होम डिपार्टमेंट पेक्षा बावनकुळे यांची ताकद भारी पडत असेल. त्यामुळे संकेतच नाव नव्याने घ्यायला आणि सेक्शन वाढवायला घाबरत आहेत, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.
सुषमा अंधारे म्हणाल्या, 'तक्रार दाखल करणाऱ्या फिर्यादीवर प्रचंड दबाव आहे, जितेंद्र सोनकांबळे हे फिर्यादी आहेत ते अनुसूचित प्रवर्गात येतात, या सगळ्यात एका अल्पसंख्याक अनुसूचित जातीच्या माणसावर दबाव आणला जात आहे, असा आरोपही अंधारे यांनी केला. अजूनही फिर्यादी जितेंद्र सोनकांबळे यावर बोललेले नाहीत, माध्यमांसमोर आलेले नाहीत, मला त्यांच्या जिवीताची जास्त काळजी आहे. फिर्यादी जितेंद्र सोनकांबळे यांना पोलीस संरक्षण दिले पाहिजे, अशी मागणीही सुषमा अंधारे यांनी केला.
"बावनकुळे यांची खरंच तपास निरपेक्ष व्हावी अशी इच्छा असेल तर तुम्हीच डीसीपीमधून आदेश द्यावेत की, संकेत बावनकुळे यांचे नाव आरोपी म्हणून वाढीव वर्ग करा, अजून सेक्शन वाढवा हे सांगा. देवेंद्र फडणवीस एकच डायलॉग घेऊन बसले आहेत, ते फक्त 'राजकारण करु नका', काय फडणवीस साहेब तुम्ही काहीही झाले की हेच म्हणता, असा टोलाही अंधारे यांनी फडणवीस यांना लगावला.
'महापुरूषांनाही राजकारणात ओढलं'
'काल आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काहीही गरज नसताना शिवस्मारक आणि शिवजयंतीचा वाद उकरुन काढत शाहू-फुले अशी तुलना सुरु केली. तुम्ही महापुरुषांना पण राजकारण करताना सोडत नाहीत. खरंतर शिवस्मारक हे टिळकांनी शोधले नाही असे म्हणण्याने टिळकांची उंची कमी होत नाही. तुम्ही महापुरुषांच्या जीवावर राजकारण करणारे, तुम्ही सांगत आहात की आम्ही राजकारण करायचे नाही, असंही अंधारे म्हणाल्या.
विम्यासाठी तक्रार दाखल केली
सुषमा अंधारे म्हणाल्या, संकेत बावनकुळे याने मित्रांसोबत दारू पिली, बीफ खाल्ले. अपघात झाल्यानंतर संकेत बावनकुळे याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात रामदास पेठमध्ये त्याने पुन्हा तीन गाड्या ठोकल्या, त्यातील एक गाडी जितेंद्र सोनकांबळे यांची होती. पोलिसांची गुन्हा नोंद करायची इच्छा नव्हती. ज्यांच्या गाड्यांचे नुकसान झाले, पण इन्शुरन्ससाठी म्हणून तक्रार घ्या सांगितल्यावर तेव्हा तक्रार नोंद झाली, असंही अंधारे म्हणाल्या.
अंधारेंनी उपस्थित केले प्रश्न
"पोलीस निरीक्षक चंद्रकांत चकाटे काय लपवत आहेत ? दोघांचं मेडिकल केलं, संकेतच मेडिकल का नाही ? गाडी एकजण चालवत होता तर एकाचेच मेडीकल करायचे दोघांचे का केले? यात गाडीचा पंचनामा केलेला नाही, कार ही फक्त २८ दिवस जुनी होती. संकेत बावनकुळे याची गाडी आहे हे पोलिसांना कळलंच नाही तरी बावनकुळे म्हणतात माझ्या मुलाच्या नावावर गाडी आहे हे त्यांनी स्वतः समोर येऊन सांगितलं आणि माझ्या मुलाची चौकशी करा असं सांगितलं. घटनेचा स्पॉट पंचनामा देखील केला नाही, यामध्ये जखमींबाबत कुठेही वाच्छता केली नाही, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.
काँग्रेस आमदारांवर टोला लगावला
काँग्रेस आमदार विकास ठाकरे काल म्हणाले मी या मतदारसंघातील आहे मला या सगळ्यातील माहिती होते, हे असं काही घटलेलं नाही. यांना सर्व माहिती होते तर ३६ तास व्यक्त व्हायला का लागले ? व्यक्त व्हायला एवढा वेळ का लागला, याचं उत्तर आम्हाला मिळालं आहे, असं प्रत्युत्तर अंधारे यांनी दिले.