नागपूर : संस्कृतचा संदर्भ हा संस्कृतीशी आहे. संस्कृत ही सर्वसमावेशक आहे. ज्ञानाचा भांडार आहे. ती कुण्या एकाची मक्तेदारी नाही. ती भारताची भाषा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.
रामटेक येथील कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या रजत महोत्सवाचा कार्यक्रम रविवारी शंकरनगर चौकातील साई सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रो. मधुसुदन पेन्ना होते, तर विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. पंकज चांदे, माजी कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी, प्रो. नंदा पुरी अतिथी म्हणून उपस्थित होते. कुलसचिव डॉ. रामचंद्र जोशी, समन्वयक प्रो. कृष्णकुमार पाण्डेय, प्रो. हरेकृष्ण अगस्ती, डॉ. दिनकर मराठे प्रामुख्याने उपस्थित होते.
नितीन गडकरी म्हणाले, संस्कृतमध्ये ज्ञानाचा अमूल्य ठेवा आहे. भारताच्या प्राचीन इतिहासाचे अनेक संदर्भ संस्कृत ग्रंथांमध्ये सापडतात. संस्कृतचा हा अमूल्य ठेवा जगात पोहोचवण्याची गरज आहे. त्यासाठी संस्कृतच्या ग्रंथांचे इंग्रजीत भाषांतर करून ते जगात पोहोचवा. मोजकेच लोक माेजकेच असोसिएशन यातून परिणामकता साधता येत नाही. त्यामुळे संस्कृत ही सगळ्यांची भाषा कशी होईल, यादृष्टीने प्रयत्न व्हावे.
माणूस हा जातीने नव्हे तर कर्माने मोठा होतो. जातीयवादामुळे हिंदुत्त्वाबद्दल गैरसमज पसरले आहेत. त्यातून शत्रू निर्माण झाले आहेत. ही जातीयता नष्ट होण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
- विनोबांचा गीतेचा सार व राष्ट्रसंतांची ग्रामगीता संस्कृतमध्ये भाषांतरीत व्हावी
विनोबा भावे यांनी मांडलेला गीतेचा सार व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता ही संस्कृतमध्ये भाषांतरीत होऊन ती सर्वांपर्यंत पोहोचावी. तसेच रामटेक येथे अध्यात्म व संस्कृती यावर भव्य संग्रहालय संस्कृत विद्यापीठाने निर्माण करावे, अशी अपेक्षाही गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली.