नागपूर : संस्कृत ही अत्यंत उपयुक्त भाषा आहे. अनेक भाषांची संस्कृत ही जननी आहे. ती केवळ धार्मिक भाषा नाही. या भाषेत धार्मिक साहित्य खूपच कमी आहे. देशाच्या लोकसंख्येमधील एक मोठा वर्ग आहे ज्याला आजही इंग्रजी भाषेतील प्रशासकीय कामकाज समजू शकत नाही. आज हिंदी व इंग्रजी या दोन भाषांना देशाच्या अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. त्या घटनेच्या कलम ३४४ नुसार संस्कृतचाही समावेश करता येऊ शकतो, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी केले.
संस्कृत भारतीतर्फे रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात आयोजित तीनदिवसीय अखिल भारतीय छात्र संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी झाले. यावेळी अध्यक्षस्थानी माजी सरन्यायाधीश शरद बोबडे होते. उद्घाटक म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाचे अखिल भारतीय अध्यक्ष, बंगलोर येथील खासदार तेजस्वी सूर्या, तर रामजन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज, संस्कृत भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष प्रा. गोपबंधू मिश्र उपस्थित होते.
यावेळी माजी सरन्यायाधीश बोबडे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच संस्कृत ही भारताची अधिकृत भाषा करावी, असा प्रस्ताव मांडला होता. यावर पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला असता त्यांनी उत्स्फूर्तपणे ‘संस्कृतमध्ये चूक काय आहे’, असा प्रतिप्रश्न केला होता. बाबासाहेबांचा तो प्रश्न आजही अनुत्तरित आहे, असेही बोबडे म्हणाले. इंग्रजांनी पद्धतशीरपणे या देशातील संस्कृत व अरेबिक भाषेच्या वापरावर बंदी आणली व या देशावर इंग्रजी लादली. संस्कृत ही भाषा दक्षिण किंवा उत्तर भारताशी संबंधित नाही आणि ती धर्मनिरपेक्ष वापरासाठी पूर्णपणे सक्षम आहे. नासाच्या एका शास्त्रज्ञाने तर ही भाषा संगणकासाठी अतिशय योग्य व उपयुक्त असल्याचा शोधनिबंध सादर केला आहे. त्यामुळे इंग्रजीला पर्याय शोधला गेला पाहिजे, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रा. डॉ. मधुसूदन पेन्ना यांनी ज्ञानेश्वरीच्या संस्कृतमध्ये अनुवाद केलेल्या ग्रंथाचे लोकार्पण ही गोविंददेवगिरी महाराज यांनी केले. प्रास्ताविक संस्कृत भारतीचे अ.भा. महामंत्री सत्यनारायण भट्ट यांनी केले. स्वागत समितीचे अध्यक्ष उद्योगपती सत्यनारायण नुवाल यांनी स्वागतपर भाषण केले. संचालन विदर्भ प्रांत मंत्री भरतकुमार पंडा यांनी केले. आभार प्रांत उपाध्यक्ष श्रीनिवास वर्णेकर यांनी मानले.
शिक्षण धोरणात संस्कृतवर भर : सूर्या
- देवभाषा असणारी संस्कृत, ही मानव जातीला उपलब्ध असणारी, सर्वात सुंदर भाषा आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये संस्कृत संवर्धनावर भर देण्यात आला आहे. संस्कृतच्या विकासासाठी युवकांनी जास्तीत जास्त योगदान द्यावे, असे आवाहन खासदार तेजस्वी सूर्या यांनी केले.