लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनलॉक-१ मध्ये हॉटेल्स आणि रेस्टॉरंट संचालकांना केवळ पार्सलसाठी मनपाने परवानगी दिली आहे. पण नागपुरातील बहुतांश सावजी रेस्टॉरंट मागच्या दाराने सुरू असून अनेक शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये खवय्यांसाठी बसण्याची व्यवस्था आहे. यामुळे मनपाच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. आता लोकांमध्ये कोरोनाची भीती नाही. त्यामुळेच ग्राहकांची गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे.
टेलिफोन एक्स्चेंज चौकालगतचा परिसर आणि गोळीबार चौक, पाचपाचली भागातील सावजी रेस्टॉरंटमध्ये पार्सल व्यवस्थेसोबतच बसून जेवणाची व्यवस्था उपलब्ध आहे. हा सर्व प्रकार रात्री ९ नंतर सुरू होतो. सावजीमध्ये ४० ते ५० लोक एकाचवेळी जेवणाचा आनंद घेत आहेत. ही बाब पोलिसांना माहिती असतानाही कारवाई शून्य आहे. हा प्रकार नागपुरात सर्वच भागात सुरू आहे. रात्री ९ नंतर सुरू होणाऱ्या कर्फ्यूमध्ये लोक मांसाहारी पदार्थावर ताव मारत आहेत. अडीच महिने लोक घरातच बंद होते. १ जूनपासून अनलॉकमध्ये त्यांना संधी मिळताच भयमुक्त होऊन मित्र एकत्रितरित्या हॉटेल्समध्ये जात आहेत. हॉटेल्सला ग्राहक मिळत असल्याने त्यांची आर्थिक मिळकत सुरू झाली आहे.
सावजी रेस्टॉरंटचा संचालक नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाला, सर्वच रेस्टॉरंटचे किचन सुरू झाले आहे. खवय्यांना पार्सलमध्ये मजा येत नाही. प्रशासन थोडे नरमल्याने लोकांच्या पार्ट्या रात्री उशिरापर्यंत सुरू झाल्या आहेत. संचालकांचे अडीच महिन्यांपासून उत्पन्न बंद होते. किचन सुरू झाल्यानंतर संचालकांनीही रिस्क घेऊन ग्राहकांना बंद दाराआड हॉटेलमध्ये बसविणे सुरू केले आहे. ही बाब अवैध असली तरीही आर्थिक उत्पन्नासाठी संचालकांनी रिस्क घेतली आहे. सुरुवातीला काही रेस्टॉरंट सुरू झाले. नंतर सर्वांनीच ग्राहकांना जेवण देणे सुरू केले. लोक खाण्यापिण्याचा आनंद घेत आहेत. रेस्टॉरंटचे प्रवेशद्वार बंद ठेवून हा व्यवहार करावा लागत आहे.
शाकाहारी रेस्टॉरंट संचालकही यात मागे नाही. बडकस चौकातील एका हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी चार टेबलची व्यवस्था केली आहे. त्याठिकाणी पार्सलसोबतच शाकाहारी पदार्थ बसून खाण्याची सोय आहे. अनेक हॉटेल्स संचालकांनी पार्सल देऊन ग्राहकांसाठी बाजूलाच बसण्याची बसून खाण्यासाठी सोय केली आहे. नवी शुक्रवारी भागातील एका नामांकित हॉटेल संचालकाने ग्राहकांसाठी समोसे, कचोरी आणि मिसळ खाण्याची सोय करून दिली आहे. याशिवाय अनेक बीअरबारमध्ये पार्सलच्या नावाखाली लोकांच्या बैठका सुरू झाल्या आहेत.
लक्ष कोण ठेवणार?मागच्या दाराने सुरू असलेले हॉटेल्स आणि रेस्टॉरंटवर कारवाई कोण करणार, हा गंभीर मुद्दा आहे. पदार्थांची गुणवत्ता, दर्जा आणि स्वच्छता तपासणीचे काम आमचे असल्याचे मत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. मनपाने पार्सलकरिता परवानगी दिली आहे. त्यानंतरही संचालक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू ठेवून ग्राहकांना सेवा देत असेल तर मनपा अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.