नागपूर - पश्चिम बंगालमधील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. निवडणूक संपली की स्पर्धा संपली, निवडून येणारे सर्व पक्षीय आता मिळून देशाचे काम करणे आवश्यक असते. पण पश्चिम बंगालमध्ये काय सुरू आहे. एक हार सहन होत नाही ही चांगली बाब नाही. एकीकडे देश तोडणाऱ्यांविरुद्ध लढत असल्याचा देखावा करायचा आणि दुसरीकडे समाजसमाजाला लढून आपली राजकीय पोळी शेकायची हे चांगले नाही, अशा शब्दात सरसंघचालकांनी ममता बॅनर्जी यांचे कान टोचले.
भारताला विकसित होऊ न देण्यासाठी जगात अनेकजण प्रयत्नरत आहेत. जगातील एकाही देशाचे भारतात पूर्ण समर्थन नाही. आपण सक्षम झालो म्हणून नाईलाजाने समर्थन करावे लागते. आज देश प्रगती करीत आहे अशा या वेळी आपसातील हे भांडणात देशाचे अहित पाहणाऱ्यांसाठी फायद्याचे ठरेल. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनीही संविधान सभेच्या भाषणात या बाबतच्या धोक्याचा इशारा दिला होता.