नागपूर : सरदार वल्लभभाई पटेल यांची जन्मशताब्दी ३० आॅक्टोबर रोजी असून हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. सरदार पटेल यांनी स्वातंत्र्य चळवळीत आणि त्यानंतर देशाची राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी जे योगदान दिले, त्याविषयी जनजागृती निर्माण व्हावी. यासाठी नागपुरात एकता दौड आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सभेत ते बोलत होते. या सभेस शहर सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंग, महापालिका आयुक्त श्याम वर्धने, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जोंधळे प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रीय एकता दिवस ही एक लोकप्रिय चळवळ व्हावी, यासाठी समाजातील सर्व स्तरातील लोकांना स्वैच्छिक सहभागासाठी आमंत्रित करण्यात येत आहे. नागपुरात ३१ आॅक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता संविधान चौकातून एकता दौडीला सुरुवात होईल. ही दौड आकाशवाणी चौक, व्ही.सी.ए. मैदान, नागपूर सुधार प्रन्यासमार्गे परत संविधान चौकात येईल. या दौडीमध्ये पाच हजार अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था सहभागी होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली. तसेच सायंकाळी पोलीस, एनसीसी, राष्ट्रीय सेवा योजना, बालवीर, वीरबाला, गृहरक्षक दल यांचे शहरात संचालन होईल, असेही त्यांनी सांगितले. सकाळी होणाऱ्या एकता दौडीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, तसेच इतर शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी सहभागी होतील. यासंदर्भात एक परिपत्रक सर्व कार्यालयांना पाठविण्यात येईल. तसेच क्रीडा विभगातर्फे सर्व खेळाडूंना सुद्धा या दौडमध्ये सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी सांगितले. यावेळी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, उपजिल्हाधिकारी सर्वश्री जे.बी. संगीतराव, निशिकांत सुके, गिरीश जोशी, दिलीप सावरकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. भाऊ दायदार, क्रीडा उपसंचालक विजय संतान, नेहरू युका केंद्राचे संजय राऊत, कार्यकारी अभियंता संजय इंदूरकर, शिक्षणाधिकारी डी.पी. लोखंडे, एनसीसीचे सिंग, सहायक पोलीस आयुक्त एन.झेड. कुमरे, डॉ. रवींद्र इंगोले उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी एकता दौड
By admin | Published: October 28, 2014 12:22 AM