लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्री साईबाबांच्या ‘चर्म’चरण पादुकांचा शिर्डी ते नागपूर साईमंदिर असा प्रवास अत्यंत कडेकोट सुरक्षेत झाला. संपूर्ण प्रवासात साई रथात शिर्डी मंदिराच्या ट्रस्टींसह १६ प्रतिनिधी आणि दोन बंदूकधारी पहारा देत होते.सेवक प्रकाश ठाकरे यांनी सांगितले की, ‘चर्म’चरण पादुका नागपुरात आणण्यासाठी श्री साईबाबा सेवा मंडळाचे कोषाध्यक्ष राजेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वात साई मंदिराकडून चार जणांची चमू शिर्डी येथे मंगळवारी पोहोचली. त्यात अभिनव शोभणे आणि अमोल चलपे होते. बुधवारी सकाळी ६ वाजता ‘चर्म’चरण पादुकांचा प्रवास शिर्डी येथून सुरू झाला. तत्पूर्वी प्रशासकीय अधिकारी यू.पी. गोंदेकर आणि सुरक्षा अधिकाºयांच्या उपस्थितीत पादुका काचेच्या पेटीतून काढून पुन्हा पेटीत ठेवीपर्यंत व्हिडिओ शुटिंग करण्यात आले आणि पेटीला लॉक करण्यात आले.रथाची सजावट असलेल्या एका व्हॉल्वो बसमधून शिर्डी येथील मंदिराचे अधिकारी, चोपदार, चालक-वाहक, सुरक्षा अधिकारी अशा एकूण १६ जणांच्या ताफ्यासह पादुकांचा प्रवास सुरू झाला. मार्गात अनेक ठिकाणी भक्तांची दर्शनासाठी गर्दी होती. पण प्रशासकीय अधिकाºयांच्या आदेशानुसार मार्गात कुठेही रथ थांबविण्यात आला नाही. मजल दरमजल प्रवास करीत रथ बुधवारी रात्री ८ च्या सुमारास वाडी येथे पोहोचला. त्याठिकाणी श्री साईबाबा सेवा मंडळाने तयार केलेल्या एका विशेष रथावर ‘चर्म’चरण पादुका ठेवण्यात आल्या आणि वाजतगाजत हजारो भक्तांच्या उपस्थितीत वर्धा रोड येथील साई मंदिरात रात्री १०.३० वाजता पोहोचल्या. वाडी ते साई मंदिर या मार्गावर काढण्यात आलेल्या शोभायात्रेत १४ स्वागत गेट होते. फुले आणि रांगोळ्या काढून मार्गाची सजावट करण्यात आली होती. ठिकठिकाणी भक्तांनी पादुकांची आरती केली.रात्री ‘चर्म’चरण पादुका शिर्डी येथील चार ट्रस्टींच्या ताब्यात एका खोलीत ठेवण्यात आल्या. सकाळी ५.३० वाजता काकड आरतीनंतर भक्तांना दर्शनासाठी काचेच्या पेटीत मूर्तीसमोर ठेवण्यात आल्या. गुरुवारी रात्री १०.३० वाजता सेझ आरतीनंंतर पादुका पुन्हा ट्रस्टींच्या ताब्यात सुरक्षेत ठेवण्यात येतील. ‘चर्म’चरण पादुकांचा शिर्डीकडे परतीचा प्रवास शुक्रवारी सकाळी ६ वाजता सुरू होणार आहे. नागपुरातील साईभक्तांना पहिल्यांदाच ‘चर्म’चरण पादुकांचे दर्शन घेण्याचा योग आला.