नागपूर : मदतीसाठी तत्पर असूनही काहीसा उपेक्षित असणारा घटक म्हणजे रेल्वे स्थानकावरचा कुली. रेल्वेस्थानक परिसरात पाय ठेवताच तो सहज नजरेस पडतो. गाडीतून बाहेर आणि बाहेरून गाडीतील आसनापर्यंत तो तुमचे ओझे वाहून नेतो. मात्र, त्याची काही फारशी ओळख नसते अन् त्याच्याबद्दल कुुणाला फारसा कणवही नसतो. दहा-वीस रुपये त्याच्या हातावर टिकविले की संपला विषय.
या कुलीला खरी ओळख महानायक अमिताभ बच्चन यांनी आजपासून ४० वर्षांपूर्वी दिली होती. मनमोहन देसाई दिग्दर्शीत अमिताभ यांचा कुली हा चित्रपट १९८३ ला प्रदर्शीत झाला. रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे ओझे वाहून नेणाऱ्या मजुराच्या अर्थात कुलीच्या जिवनावर आधारित हा चित्रपट ब्लॉक बस्टर ठरला. त्यावेळी या चित्रपटाने १० मिलिनियम पेक्षा जास्त कमाई केली आणि कुलींना एक वेगळी ओळखही दिली होती. पुढे रेल्वे मंत्रालयाने कुलींना रेल्वेच्या मस्टरवर जागा देऊन त्यांच्या प्रवास आणि आरोग्याची जबाबदारी उचलली. नंतर त्यांना 'कुली नव्हे तर रेल सहायक' संबोधण्याचे आदेश रेल्वेकडून आले. मात्र, त्यांच्या रोजी रोटीकडे अद्यापही कुणाचे लक्ष नाही. अमिताभने कुलीची व्यक्तीरेखा साकारताना 'लोग आते है... लोग जाते है... हम यही पे खडे रहे जाते है. सारी दुनिका का बोझ हम उठाते है', असे म्हटले होते.
भारी-भरकम ओझे वाहून नेणारा एक कुली फार तर दररोज ३०० ते ४०० रुपये कमवितो. नागपूर रेल्वे स्थानकावर १५५ कुली आहेत. यातील पन्नासावर कुली बाहेरगावचे आहेत. उन्हाळ्यात बऱ्यापैकी गर्दी असल्यामुळे ते काम करतात. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात शंभरेक (पन्नास-पन्नास) कुली दोन शिफ्टमध्ये ओझे वाहन्याचे काम करतात. रेल्वे स्थानकावर त्यांच्याशी सहज चर्चा केली तर त्यांच्या वेदना लक्षात येतात. एवढ्या महागाईच्या जमान्यात ३०० ते ४०० रुपयात कसे कुटुंबं चालवायचे, असा केविलवाणा प्रश्न ते करतात. अन्य कामगारांप्रमाणे रेल्वेकडून एक निश्चित वेतनाची व्यवस्था केली जावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.
रेल्वेकडून काय मिळते ?कुलींना रेल्वेकडून एक आरोग्य कार्ड मिळते. त्यानुसार, औषध उपचाराची त्यांची सोय होते. वर्षातून पाच महिन्यांचा फ्री पास मिळतो. या पासच्या आधारे त्यांना कुठेही प्रवास करता येतो.
६० रुपये द्या अन् ....
कुलींची खरी ओळख आहे, त्यांचा लाल शर्ट. या शर्टचा कापड रेल्वे प्रशासनाकडून कुलींना देण्यात येतो. त्यासाठी त्यांना ६० रुपये जमा करावे लागतात. त्या बदल्यात वर्षातून एकदा दोन शर्टाचा कापड कुलींच्या हातात ठेवला जातो. त्याची शिलाई मात्र मिळत नाही. कुलींना ती स्वत:च्या खिशातून द्यावी लागते. सध्या कुलींना शर्टचे कापड मिळत आहे.