भिवापूर (नागपूर) : घरकुल मंजूर करून देण्यासाठी सात हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तालुक्यातील एका सरपंचालालाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी रंगेहात अटक केली. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. लाचेच्या रकमेत आणखी तिसऱ्या कुणाचा तर वाटा नव्हता ना, असा प्रश्न विचारला जात आहे.
संजू दिलीप नाईक (वय २७) असे लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सरपंचाचे नाव आहे. तो सालेशहरी (पुनर्वसन) ग्रामपंचायतीचा सरपंच आहे. तक्रारकर्ता गोपाल किसन झोडगे (रा. सालेशहरी) याचे वडील किसन झोडगे हे (गोसेखुर्द) प्रकल्पग्रस्त असून, ते नागपूरला वास्तव्यास आहे. त्यांना सालेशहरी येथे शासनाकडून भूखंड मिळाला आहे. त्यावर घरकुल मंजूर करून देतो असे सांगत सरपंच संजू नाईक याने सात हजार रुपयांची मागणी केली होती.
तक्रारकर्त्यास पैसे द्यायचे नसल्याने त्याने गत २० जुलैला नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. एसीबीच्या वरिष्ठ अधिकारी अनामिका मिर्झापुरे यांनी तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सापळा रचला. त्यानुसार शुक्रवारी दुपारच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारापुढे असलेल्या पाणटपरीवर तक्रारकर्ता गोपाल झोडगे यांच्याकडून पैसे स्वीकारताच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सरपंच संजू नाईकला रंगेहात ताब्यात घेतले. लागलीच त्याला पोलीस ठाण्यामध्ये नेत त्याच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू केली. रात्री उशिरापर्यंत ती सुरू होती.
पंचायत समिती कार्यालयात खळबळ
एसीबीच्या पथकाने पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारापुढे असलेल्या पानटपरीवर ही कारवाई केल्यामुळे खळबळ उडाली. महत्त्वाचे म्हणजे पंचायत समिती कार्यालयात सध्या पैसे घेऊन काम करणारे दलाल आणि एंजंटांचा सुळसुळाट आहे. ‘अर्धे तुम्ही अर्धे आम्ही’ या उक्तीप्रमाणे त्यांचे काम सुरू असते. त्यामुळे सरपंच संजू नाईक प्रकरणात पंचायत समितीच्या घरकुल विभागाकडे संशयाच्या नजरेने बघितले जात आहे.