लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सरपंचपदावर गदा येण्याचे संकेत मिळाल्याने ग्रामसेवक तसेच दलालांना हाताशी धरून बनावट जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याचा प्रकार डोंगरताल (रामटेक) येथील सरपंचाच्या अंगलट आला. बनवाबनवी उघड झाल्याने जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सीताबर्डी पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
नितेश श्रीराम सोनवणे (सरपंच), ज्ञानेश्वर विठोबाजी नेहारे (ग्रामसेवक) तसेच प्रमोद मसराम आणि लोणारे (दोघेही दलाल) अशी आरोपींची नावे आहेत. सोनवणे यांनी आपले सरपंचपद टिकविण्यासाठी गामसेवक नेहारे तसेच मसराम आणि लोणारे या दलालांना हाताशी धरून बनावट कागदपत्रे तयार केली. ती २६ फेब्रुवारीला निवडणूक अधिकारी रामटेक यांना सादर केली. त्यानंतर बनावट खसरा, अभिलेख, मृत्यू प्रमाणपत्र तसेच आणखी काही कागदपत्रे अनुसूचित जाती-जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती (गिरीपेठ) कार्यालयात सादर केली. ती बनावट असल्याचे लक्षात आल्याने दक्षता पथकाचे पोलीस निरीक्षक प्रदीप रामनाथ लांडे यांनी सीताबर्डी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्यावरून उपरोक्त आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
-----