काटोल : काटोल तालुक्यातील कलंभा ग्रामपंचायतीचे सरपंच युवराज आटोने व सचिव विजय बारमासे यांनी संगनमत करून, ज्या कंत्राटदाराला भूमिगत नाली बांधकामाकरिता साहित्य पुरविल्यापोटी पैसे द्यायचे होते, त्या कंत्रादाराच्या नावाने चेक न काढता, दुसऱ्याच कंत्राटदाराच्या नावाने चेक काढून, ग्रामपंचायतच्या आर्थिक निधीची अफरातफर केल्याचा आरोप चोरघडे कन्स्ट्रक्शन कंपनीचे अनुप चोरघडे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी काटोल पंचायत समितीच्या खंड विकास अधिकाऱ्याकडे ६ जून रोजी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारींवर कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी २ जुलै रोजी या संदर्भात काटोल पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार दाखल केली आहे.
कलंभा ग्रामपंचायतीने खनिज विकास निधीअंतर्गत भूमिगत नाली बांधकामाकरिता ५ लाख रुपयांची ई-निविदा काढण्यात आली होती. यात बांधकाम साहित्य पुरविण्याचे कंत्राट चोरघडे कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले. या संबंधी २३ मे, २०२०च्या ठराव क्र. ११ नुसार निविदा मंजूर करून, ग्रामपंचायतीसोबत करारनामा करण्यात आला. पुढे ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार, बांधकामाकरिता गिट्टी, रेती, सिमेंट व मुरुम आदी ६६,९०० रुपयांचे साहित्य चोरघडे कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने ५ जुलै, २०२० रोजी पुरविण्यात आले. हे साहित्य ग्रामपंचायतीला मिळाले. याची पोच कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आली. मात्र, बिल काढताना सरपंच व सचिव यांनी ६६,९०० रुपयांचे बिल चोरघडे कन्स्ट्रक्शनच्या नावे न काढता, कबीर सिमेंट प्रॉडक्ट कंपनीच्या नावे काढले. असे हेतुपुरस्सर करण्यात आले असून, याचे पैसे मला अद्याप मिळालेले नाही, असा आरोप चोरघडे यांनी तक्रारीत केला आहे. या प्रकरणी सचिव व सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी पंचायत समिती काटोल व पोलीस स्टेशन यांच्याकडे करण्यात आली आहे.
---
कलंभा ग्रामपंचायतीसंदर्भात तक्रार प्राप्त झाली आहे. चौकशीअंती झालेला प्रकार कळेल.
संजय पाटील, खंड विकास अधिकारी, काटोल.