नागपूर : डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हाऊस ऑफ कलाम, स्पेस झोन इंडिया, मार्टिन ग्रुप यांच्या वतीने डॉ. एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल मिशन २०२३चे आयोजन करण्यात आले आहे. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी तामिळनाडूतील पत्तीपुरम येथून १५० पिको सॅटेलाइट, रॉकेटसह प्रक्षेपित होणार आहेत. हा जगातील पहिलाच शैक्षणिक प्रयोग आहे. या मिशनची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे. या मिशनमध्ये नागपूर महापालिकेच्या २० विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. हे विद्यार्थी सॅटेलाईट तयार करणार आहेत.
शालेय जीवनात अंतराळ तंत्रज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करून भविष्यात अवकाश संशोधन तंत्रज्ञानामध्ये विद्यार्थ्यांनी आपले योगदान द्यावे, या उद्देशाने डॉ. एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल मिशन २०२३चे आयोजन केले आहे. देशभरातील वर्ग ५ ते १२ चे ५००० विद्यार्थी या मिशनमध्ये सहभागी होणार आहेत. यात नागपूर महापालिकेच्या शाळेतील २० विद्यार्थी आहेत. या मिशनमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पिको सॅटेलाईट व रॉकेट बनविण्याचे ऑनलाइन प्रशिक्षण दिले जात आहे. सॅटेलाईट बनविण्यासाठी लवकरच नागपूर येथे कार्यशाळाही होणार आहे. कार्यशाळेनंतर हे विद्यार्थी चेन्नई येथे जाऊन प्रत्यक्ष रॉकेट बनवतील. महापालिकेच्या उपक्रमशील विज्ञान शिक्षिका दीप्ती बिष्ट या मिशनच्या समन्वयक आहेत. या मिशनसाठी अतिरिक्त आयुक्त राम जोशी व शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
- जगातील पहिलाच प्रयोग
रॉकेटसह १५० पिको सॅटेलाईट प्रक्षेपित करण्यासाठी सर्व परवानग्या केंद्र व राज्य सरकारकडून मिळविण्यात आल्या आहेत. हे रॉकेट व सॅटेलाईट अवकाशात सोडल्यानंतर पॅराशूटच्या साहाय्याने परत जमिनीवर लॅण्ड करेल आणि पुढील मिशनसाठी परत वापर करता येईल. विद्यार्थिनींनी बनविलेले १५० सॅटेलाईट रॉकेटसह प्रक्षेपित करणारा हा जगातील पहिला प्रयोग असल्याचा दावा मिशनच्या राज्य समन्वयक मनिषा चौधरी व महासचिव मिलिंद चौधरी यांनी केला आहे.
या मिशनच्या माध्यमातून मुलांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्लॅटफॉर्म मिळाला असून, रॉकेट सायन्ससारखे अवघड विषय शिकण्याची संधी महापालिकेच्या मुलांना मिळाली आहे. अशा प्लॅटफॉर्ममुळे मनपाच्या शैक्षणिक दर्जा उंचविण्यास मदत होणार आहे.
दिप्ती बिष्ट, विज्ञान शिक्षिका, नागपूर महापालिका