नागपूर : पारडसिंगा, ता. काटोल येथील माऊली सती अनसूया माता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची जोरदार चपराक बसली आहे. आयोगाने तक्रारकर्त्या ग्राहकाची १ लाख ६७ हजार ८४७ रुपयाची मुदत ठेव १२ टक्के व्याजासह परत करण्याचा आदेश सोसायटीला दिला आहे. व्याज ९ मार्च २०१७ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले आहे. तसेच, ग्राहकास शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १५ हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कम सोसायटीनेच द्यायची आहे.
भोजराज आमले असे ग्राहकाचे नाव आहे. त्यांना आयोगाचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य स्मिता चांदेकर व अविनाश प्रभुणे यांनी दिलासा दिला. प्रकरणातील माहितीनुसार, आमले यांनी सोसायटीमध्ये १ लाख ६५ हजार रुपयाची मुदत ठेव केली होती. ती मुदत ठेव ९ मार्च २०१७ रोजी परिपक्व होऊन आमले यांना १ लाख ६७ हजार ८४७ रुपये दिले जाणार होते. त्यानुसार, आमले यांनी मुदत ठेव परिपक्वतेनंतर सोसायटीला संबंधित रकमेची मागणी केली. परंतु, सोसायटीने विविध कारणे सांगून त्यांना रक्कम परत दिली नाही. परिणामी, आमले यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती. त्यात हा निर्णय देण्यात आला.
---------------
कठीण काळाकरिता केली जाते बचत
कठीण काळामध्ये पैसे वापरायला मिळावे, याकरिता बचत केली जाते. त्यानुसार, आमले यांनी गरजेच्या वेळी सोसायटीला पैसे परत मागितले होते. परंतु, सोसायटीने त्यांची मागणी पूर्ण केली नाही. त्यावरून सोसायटीने आमले यांच्यासोबत अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केल्याचे स्पष्ट होते, असे परखड निरीक्षण आयोगाने सदर निर्णय देताना नोंदविले.