लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यावर्षी जिल्ह्यात वाढलेल्या पर्जन्यमानामुळे कामठी व सावनेर तालुक्यात जलस्तर वाढला आहे, ही आनंदाची बाब असली तरी भिवापूर, मौदा आणि काटोल या तीन तालुक्यांची जलपातळी मात्र घसरली आहे. असे असले तरी मुबलक पावसामुळे यंदा पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येणार नाही, असा विश्वास भूजल सर्व्हेक्षण विभागाने व्यक्त केला आहे.
यावर्षी सर्वत्र जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पाण्याची पातळी वाढण्याची अपेक्षा सहाजिक होती. नागपूर जिल्ह्यातही वाढ झाली पण ती सामान्य आहे. भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा, नागपूर या विभागाने यावर्षी सप्टेंबर अखेरीस जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये भूजल पातळीचे सर्व्हेक्षण केले. यासाठी त्यांनी सर्व तालुक्यातील ठरलेल्या १११ निरीक्षण विहिरींच्या नोंदी घेतल्या. या नाेंदणीची पाच वर्षाच्या नाेंदीशी तुलना केल्यास ही काही तालुक्यात झालेली वाढ सामान्य म्हणावी लागेल.
कामठी तालुक्यात यावर्षी जलस्तरात १.२० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र गेल्या वर्षी ती १.४६ हाेती आणि २०१८ मध्ये ०.०४ टक्के इतकी हाेती. सावनेर तालुक्यात सप्टेंबर २०२० च्या सर्व्हेक्षणानुसार जलस्तरात १.३१ टक्के एवढी वाढ नाेंदवली आहे. २०१९ मध्ये ती १.०७ टक्के तर २०१८ मध्ये ०.०६ टक्के इतकी हाेती. भिवापूर तालुक्यात जलस्तरात ०.२४ टक्के घट नाेंदवली आहे. या तालुक्यात गेल्या वर्षीही ०.६३ टक्के घट हाेती. काटाेल तालुक्यात ०.६१ टक्केची वाढ नाेंदवली हाेती, मात्र यावेळी ०.३७ टक्क्याने जलस्तर घटले आहे. २०१८ मध्ये हा तालुका धाेक्याच्या पातळीत हाेता. २०१९ मध्ये ०.८९ टक्क्याने सरप्लस असलेल्या माैदा तालुक्यात यावर्षी जलस्तर ०.३५ टक्क्याने घटला आहे. विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते ही घट सामान्य आहे आणि वर्षभर त्याचा परिणाम जाणवणार नाही.