नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्या प्रमाणे वकिली हा नुसता एक व्यवसाय नसून ते सामाजिक बदल घडवून आणणारे साधन आहे. तसेच संविधानाची मूल्ये जपूनच न्यायदानात समाधानकारक कामगिरी करणे गरजेचे आहे, प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू न्यायमूर्ती भूषण गवई यांनी येथे केले.
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या वारंगा येथील शैक्षणिक परिसरात आयोजित द्वितीय दीक्षांत समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ हे प्रमुख अतिथी होते. तर या विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू व माजी सरन्यायाधीश शरद बोबडे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायाधीश न्या. नितीन सांबरे, न्या. अतुल एस. चांदूरकर, आणि न्यायमूर्ती अनिल किलोर हे प्रमुख पाहुणे होते. कुलगुरू न्या. गवई म्हणाले, नवीन पिढीतील तरुण वकीलांनी विविध कौशल्ये आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून हे क्षेत्र अजून विकसित केले आहे. विधी क्षेत्र हे विविध आव्हानांनी अंतर्भूत असून विद्यार्थ्यांनी या आव्हानाचा मजबुतीने सामना करावा. प्रखर इच्छाशक्ती, खडतर मेहनत, सातत्य हे गुण जपूनच विद्यार्थ्यांनी विधी क्षेत्र आणि विधी सेवा अजून सुलभ आणि सर्वांना उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
न्यायमूर्ती विक्रम नाथ म्हणाले, संविधानाची आणि न्यायाची मूल्ये जपूनच आपल्याला न्यायदानाची कार्य करावी लागणार आहे. दीक्षांत समारंभ झाल्यावर विद्यार्थी वर्गाची खरी व्यावसायिक कारकीर्द सुरू झाली असून विधी क्षेत्रात पण त्याच उत्साह उमेदीने कार्य करावे. मुट कोर्ट हे विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध करून देत असून यांचा फायदा हे भविष्यात नक्कीच होईल अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.
श्रेया त्रिपाठी आणि सहस्त्रश्रील उमापांडे यांनी पटकावली सर्वाधिक पदके
समारंभात एकूण ६ आचार्य पदवी प्रमाणपत्र , ३७ पदव्युत्तर प्रमाणपत्र, १०५ पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच २१ गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. श्रेया त्रिपाठी आणि सहस्त्रश्रील उमापांडे यांनी सर्वाधिक सुवर्ण पदक प्राप्त केले.