सतिश चतुर्वेदी यांचे निलंबन रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 08:53 PM2019-08-28T20:53:47+5:302019-08-28T20:56:13+5:30
माजी मंत्री डॉ.सतीश चतुर्वेदी यांचे निलंबन काँग्रेस पक्षाने रद्द केले आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी यासंदर्भात पत्र जारी केले व केंद्रीय नेतृत्वाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माजी मंत्री डॉ.सतीश चतुर्वेदी यांचे निलंबनकाँग्रेस पक्षाने रद्द केले आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी यासंदर्भात पत्र जारी केले व केंद्रीय नेतृत्वाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले. चतुर्वेदींच्या समर्थकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
मनपा निवडणुकांदरम्यान चतुर्वेदी व काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यात तिकीट वाटपावरून तणाव निर्माण झाला होता. चव्हाण यांच्याविरोधात माजी मंत्री नितीन राऊत, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आमदार अशोक धवड, माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मोर्चाच उघडला होता. शहर काँग्रेसमध्ये माजी खासदार विलास मुत्तेमवार व शहराध्यक्ष विकास ठाकरे तसेच चतुर्वेदी-राऊत यांचे वेगवेगळे गट निर्माण झाले होते. पक्षाविरोधात केलेल्या कारवायांसाठी पक्षाने चतुर्वेदी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्याचे उत्तर न दिल्याने २२ फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. हे निलंबन मागे घेण्यात यावे यासाठी चतुर्वेदी समर्थकांनी दिल्लीदेखील गाठली होती. थोरात प्रदेशाध्यक्षपदी आल्यानंतर चतुर्वेदी यांची घरवापसी होईल, असे कयास लावण्यात येत होते. त्यातच चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत चतुर्वेदी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. अखेर बुधवारी निलंबन रद्द झाल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. निलंबनानंतरदेखील मी काँग्रेसचाच कार्यकर्ता होतो. पक्षाच्या विचारधारेपासून मी कधीच दूर जाऊ शकत नाही, अशी भावना चतुर्वेदी यांनी व्यक्त केली.