लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखा पोलिसांनी अॅड. सतीश उके यांची केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा आरोप डेमोक्रेटीक अॅडव्होकेट असोसिएशन फॉर कॉन्स्टिट्यूशनल अॅक्शन (डाका) या संघटनेने केला आहे. डाकाचे मुख्य संघटक अॅड. संजय पाटील यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, हे प्रकरण मौजा बाबुळखेडा येथील खसरा क्रमांक ८२/२ या जमिनीशी सबंधित आहे. या जमिनीवरून शोभाराणी नलोडे या महिलेने २०१२ मध्ये अॅड. सतीश उके व त्यांच्या कुटुंबियांविरोधात न्यायालयात दिवाणी दावा केला आहे. मात्र महिलेने पोलिसांत तक्रार केली नव्हती. याच जमिनीसाठी २०१४ मध्ये वाकेकर नामक व्यक्तीने शोभाराणी नलोडे या फिर्यादी महिलेविरोधात दिवाणी दावा केला आहे. शिवाय या महिलेविरोधात सक्करदरा पोलीस स्टेशनमध्ये जमिनीच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. विशेष म्हणजे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एल.एस. वार्टीकर यांनी अॅड. उके यांना अटक केल्यानंतर महिलेकडून तक्रार नोंदवून घेतल्याचा दावा अॅड. संजय पाटील यांनी केला. दिवाणी दाव्यामध्ये महिलेने या जागेची किंमत २ लाख रुपये नमूद केली आहे तर या महिलेविरुद्धच्या दाव्यामध्ये वाकेकर यांनी ही किंमत १० लाख रुपये नमूद केली आहे. दुसरीकडे पोलिसांनी मात्र याच जागेची किंमत ५ कोटी रुपये नमूद केली आहे. यावरून पोलिसांनी हेतुपुरस्सरपणे अॅड. सतीश उके यांना अटक केली असून त्यांच्या जीवला धोका असल्याची भीती अॅड. पाटील यांनी व्यक्त केली. पत्रपरिषदेत ज्येष्ठ विचारवंत नागेश चौधरी, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद पखाले, प्रज्ज्वला तट्टे तसेच डाका संघटनेचे पदाधिकारी अधिवक्ता उपस्थित होते.
शनिवारी पुन्हा न्यायालयात हजर करणार मौजा बाभूळखेडा येथील पाच कोटी रुपये किंमतीची १.५ एकर जमीन हडपल्या प्रकरणी शनिवारी पुन्हा आरोपी अॅड. सतीश महादेवराव उके यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यांच्या पोलीस कोठडी रिमांडची मुदत संपत असून तपास अधिकारी पुन्हा वाढीव पोलीस कोठडी रिमांड मागण्याची शक्यता आहे. उके यांनी तपासात कोणतेही सहकार्य केले नसल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.