लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी, संतश्रेष्ठ गाडगेबाबा हे खरे महाराज होते. स्वत: अशिक्षित असूनही त्यांनी समाजाला विज्ञानवादी दृष्टी दिली. परंतु आजकाल गल्लोगल्ली महाराजांचे पीक आले आहे. हे नीतीभ्रष्ट महाराज ‘दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती’चे धोरण राबवून समाज नासवत आहेत. अशा महाराजांचा नाद सोडा, असे कडकडीचे आवाहन प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी केले. खासदार महोत्सवात सोमवारी त्यांची सत्यवाणी जोरादार निनादली अन् त्यांच्या विनोदी बाजाच्या बोचऱ्या शब्दांनी नागपूरकरांना विचारप्रवृत्त करून गेली. ज्यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव होतोय ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या कल्पकतेने रस्त्यावरची वाहने पाण्यात उतरवली. असे काम करणारे नेते हवे, याकडे लक्ष वेधत त्यांनी तरुणाईने आता ध्येयावर लक्ष केंद्रित करून राजकीय पक्षांच्या दऱ्या उचलणे बंद करावे, असा सल्लाही दिला. महाराज म्हणाले, आताची पिढी एैदी आहे. शिक्षणाच्या नावाखाली भलतीच काम करते. मोठे झाल्यावर आई-बापाला लाथ घालते. त्यासाठी एकच सांगतो बाबू, दारू पिऊ नका, त्याने संसाराचा नाश होतो. मुसलमान, मारवाडी दारू पित नाही म्हणून तो समाज पुढे जात आहे. सांगा बरं, मुसलमान समाजात आतापर्यंत जीवनाला कंटाळून कुणी आत्महत्या केल्याचे तुम्ही ऐकले का? कारण ते जन्माला येताबरोबर मिळेल ते काम करायला तयार असतात. त्यामुळे कुठलेही काम करायची लाज बाळगू नका. शिक्षण घेऊन नोकरीत जाणार असाल तर लोकांचे भले करा. टेबलाखालून लाच घेऊ नका. गावातून शहरात आल्याबरोबर आई-वडील तुम्हाला ओझे कसे वाटायला लागते? आयुष्याच्या संध्याकाळी या परावलंबी जीवांना जपा. वंशाला दिवाच पाहिजे म्हणून पोटातल्या कळ्या कुस्करू नका, अशा शब्दात त्यांनी बेटी बचावचा संदेश दिला. महाराजांची अस्सल मराठी भाषा, विविध पात्रांची नक्कल आणि त्याला लाभलेली लोकसंगीताची जोड त्यामुळे हे कीर्तन नागपूरकरांसाठी अविस्मरणीय ठरले. गजानन चिंचोळकर, रामा तांबेकर, सुनील चिंचोळकर, विजय बेंदरकर, राजेश धनगर यांनी महाराजांना वाद्यांवर सहसंगत केली. कीर्तनाच्या प्रारंभी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. सुधाकर कोहळे, आ. अनिल सोले, आ. कृष्णा खोेपडे, आ. विकास कुंभारे, पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम, गिरीश गांधी, वसुंधरा मासूरकर, दिलीप जाधव व ज्ञानेश्वर रक्षक यांच्या उपस्थितीत महाराजांचा सत्कार करण्यात आला.
‘दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती’चा नाद सोडा : सत्यपाल महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 11:42 PM
राष्ट्रसंत तुकडोजी, संतश्रेष्ठ गाडगेबाबा हे खरे महाराज होते. स्वत: अशिक्षित असूनही त्यांनी समाजाला विज्ञानवादी दृष्टी दिली. परंतु आजकाल गल्लोगल्ली महाराजांचे पीक आले आहे. हे नीतीभ्रष्ट महाराज ‘दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती’चे धोरण राबवून समाज नासवत आहेत. अशा महाराजांचा नाद सोडा, असे कडकडीचे आवाहन प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी केले.
ठळक मुद्देखासदार महोत्सवात निनादली ‘प्रबोधनाची सत्यवाणी’