लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : आढावा बैठकीतील पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार आणि आ. टेकचंद सावरकर यांच्यातील वादाने आता नवे वळण घेतले आहे. या बैठकीत अपमानास्पद वागणूक व शिवीगाळ करीत जिवे मारण्यची धमकी दिल्याचा आराेप करीत आ. सावरकर यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भाेयर यांच्या विराेधात कामठी (नवीन) पाेलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यातच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या तक्रारीवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करीत ठाणेदार विजय मालचे यांच्याकडे निवेदन दिले आहे.
कामठी शहरात साेमवारी (दि. १४) आयाेजित आढावा बैठकीत व्यासपीठावरील आरक्षित आसनावरून वाद उद्भवला हाेता. या बैठकीत आपल्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आराेप करीत आ. टेकचंद सावरकर यांनी पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणण्याचे जाहीर केले हाेते. मध्येच त्यांनी त्यांचा माेर्चा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भाेयर यांच्याकडे वळविला असून, त्यांनी सुरेश भाेयर यांच्या विराेधात पाेलिसांत तक्रार दाखल केली आहे.
विशेष म्हणजे, गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे टेकचंद सावरकर आणि काँग्रेसचे सुरेश भाेयर यांच्यात सरळ लढत झाली हाेती. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. याच प्रकरणात सुरेश भाेयर यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणेदार विजय मालचे यांना निवेदन दिले आहे. शिष्टमंडळात जिल्हा परिषद सदस्य अनिल निधान, तालुकाध्यक्ष किशोर बेले, शहराध्यक्ष संजय कनोजिया, भाजयुमोचे अध्यक्ष किरण राऊत, भाजप महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा मंगला कारेमोरे, कार्याध्यक्ष लाला खंडेलवाल यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश हाेता.
...
शाब्दिक चकमक
या बैठकीत पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार व आ. टेकचंद सावरकर यांच्यात शाब्दिक चकमक उडाली हाेती. सुरेश भाेयर आपल्या अंगावर धावून आले. त्यांनी शिवीगाळ करीत आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिली, असेही आ. सावरकर यांनी पाेलीस तक्रारीत नमूद केले आहे.
...
आ. टेकचंद सावरकर यांची तक्रार प्राप्त झाली आहे. या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार कारवाई केली जाईल.
- विजय मालचे, ठाणेदार,
कामठी (नवीन), पाेलीस ठाणे