नागपूर : सावरकरांना ‘स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी काळ्या पाण्याची सजा भोगून आल्यावर पत्रकार आणि कवींनी दिली. आजही देशात हिंदुत्वाचा विरोध करणारे सर्वांत आधी सावरकरांवर टीका करतात. कारण, सावरकर हिंदुत्वाचे मूळ आहेत, असे विचार लेखक विक्रम संपत यांनी व्यक्त केले. ‘सावरकर अ कन्टेस्टेड लेगसी’ या विक्रम संपत यांच्या पुस्तकाचे प्रकाशन परळ येथील आयटीसी ग्रँड सेंट्रलमध्ये करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. राज्यसभा सदस्य प्रियंका चतुर्वेदी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान पत्रकार योगेश पवार यांनी प्रियंका चतुर्वेदी आणि विक्रम संपत यांच्याशी चर्चा केली. या दरम्यान विक्रम संपत म्हणाले, सावरकरांच्या ‘सागरा प्राण तळमळला’, ‘जयोस्तुते’ या गीतांना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायनातून प्रसिद्धी मिळवून दिली. म्हणूनच विरोधकांच्या दबावावरून त्यांना ऑल इंडिया रेडिओतून बाहेर करण्यात आले होते. आजही सावरकरांच्या बद्दल समाजातील अनेकांकडून द्वेष पसरविला जात आहे. सावरकरांच्या विचारांमधून त्या काळात क्रांतिकारी प्रेरणा घ्यायचे. त्यांना इंग्रजांनी १३ वर्षे कारागृहात ठेवले. अनेकजण सावरकर यांच्यावर ते ब्रिटिशांचा एजंट असल्याचा आणि त्यांची माफी मागितल्याचा आरोप करतात. असे असते तर, ब्रिटिशांनी त्यांना दीर्घकाळ कारागृहात ठेवले नसते, हे टीका करणाऱ्यांनी समजून घ्यावे.
पुस्तकाची माहिती देताना ते म्हणाले, सावरकरांचे जीवन यात दोन खंडात वर्णिले आहे. पहिल्या खंडाएवढेच दुसऱ्या खंडालाही वाचकांचा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, आज देशात खऱ्या अर्थाने सावरकरांच्या विचारांची गरज आहे. शालेय अभ्यासक्रमात संपूर्ण सावरकर शिकवायला हवे. त्यांचे देशासाठीचे योगदान विसरणे शक्य नाही.