‘सुपर’मध्ये १५ वे मूत्रपिंड प्रत्यारोपण : पत्नीने पतीला दिले मूत्रपिंड लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : यमाच्या मागे जाऊन सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचविले होते, अशी आख्यायिका आहे. मात्र, आताच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानयुक्त काळातील सावित्रीनेही आपल्या सत्यवानाला मूत्रपिंड (किडनी) दान करून मृत्यूच्या दाढेतून परत आणले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी संलग्न असणाऱ्या ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये हे १५वे मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वी पार पडले. खरबी नागपूर येथील रामविलास वर्मा (६०) यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने ते गेल्या एक वर्षांपासून डायलिसिसवर होते. आपल्या पतीला होणारा त्रास सहन होत नसल्याने त्यांची पत्नी विमलादेवी (५२) यांनी मूत्रपिंड देण्यास पुढाकार घेतला. संपूर्ण वैद्यकीय चाचण्या पार पडल्यानंतर डॉक्टरांच्या चमूने मूत्रपिंड प्रत्यारोपणास मंजुरी दिली. दरम्यानच्या काळात रुग्णाला कावीळ आजारालाही सामोरे जावे लागले. अखेर शुक्रवारी तीन तास प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. यात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना मदतीला धावून आली. किडनी प्रत्यारोपणासाठी येणारा सर्व खर्च या योजनेतून करण्यात आला. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी ‘किडनी युनिट’ उभारण्याचे प्रयत्न केल्यामुळेच सुपरमध्ये हे शक्य झाले आहे. किडनी प्रत्यारोपण यशस्वी करण्यासाठी युरो सर्जन डॉ. संजय कोलते, नेफ्रॉलॉजिस्ट विभाग प्रमुख डॉ. चारुलता बावनकुळे, डॉ. समीर चौबे, डॉ. कुणाल मेश्राम, डॉ. अमित, डॉ. नीलेश नागदिवे, डॉ. विशाल रामटेके, भूलतज्ज्ञ डॉ. विजय श्रोते, डॉ. अमोल ठाकरे, डॉ. योगेश झंवर, डॉ. गगन अग्रवाल व मूत्रपिंड प्रत्यारोपण समन्वयक डॉ. मोहम्मद मेहराज शेख यांनी परिश्रम घेतले.
आधुनिक सावित्रीने वाचविले सत्यवानाचे प्राण
By admin | Published: May 20, 2017 2:56 AM