लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (सावनेर) : सावनेर विधानसभा मतदारसंघ सुरुवातीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. येथील मतदारांनी काँग्रेसचे सुनील केदार यांना २६ हजार २९१ मतांची आघाडी घेत पाचव्यांदा विधानसभेत पाठविण्याचा विक्रमही केला. केदार यांची या मतदारसंघावर चांगली पकड असल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले. यावेळी भाजपने जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांना पूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरविले होते. त्यांच्या प्रचारार्थ या मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भरगच्च प्रचारसभाही झाल्या. त्यामुळे वातावरणनिर्मितीही बऱ्यापैकी झाली शिवाय, शिवसेनाही दिमतीला होती. मात्र, मतदारांनी कौल दिला तो सुनील केदार यांना. केदार यांना १,१३,१८४ तर पोतदार यांना ८६,८९३ मते मिळाली. वास्तवात या मतदारसंघातील कळमेश्वर, सावनेर व खापा या तिन्ही नगरपालिका भाजपच्या ताब्यात असल्या तरी शहरांसोबतच ग्रामीण भागात भाजपचे संघटन पाहिजे तसे मजबूत नाही. याचाही फटका डॉ. पोतदार यांना बसला.सुनील केदार यांनी त्यांच्या मतांची आघाडी पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवत डॉ. पोतदार यांचा २६,२९१ मतांनी पराभव केला. या मतदारसंघात बसपाच्या संचयता पाटील यांनी भाग्य आजमावले. त्यांना २.०७ टक्के अर्थात ४,३८१ मते तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमोद बागडे यांना १.६७ टक्के म्हणजे ३,५३९ मते मिळाली. या मतदारसंघात एकूण आठ उमेदवार उभे असले तरी, या दोन्ही नेत्यांऐवजी तिसरा प्रभावी नेता रिंगणात नसल्याने काँग्रेसच्या परंपरागत मतांची फारशी विभागणी झाली नाही.
Savner Election Results : काँग्रेसचा बालेकिल्ला तोडण्यात भाजपला अपयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 2:02 AM
Saoner Election Results 2019 : Sunil Kedar Vs Rajiv Potdar,Maharashtra Assembly Election 2019
ठळक मुद्देपहिल्या फेरीपासून काँग्रेसची आघाडी : पोतदार यांचा पराभव