लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रसुतीची वेळ आली व बाळ थोडे बाहेर येऊन अडकून पडले असताना, वेदनेने ती विव्हळत होती. कुणी मदतीला येत नसताना तिने स्वत:च्या हाताने अर्धेअधिक बाळ बाहेर काढले. खांद्यामुळे बाळ आत अडकून पडले. यामुळे झालेल्या वेदनेने ती जोरात ओरडली, तेव्हा कुठे डॉक्टरला जाग आली आणि नंतर डॉक्टरने पुढील प्रक्रिया पार पडली. यावर मेडिकल प्रशासन आम्हीच तर केली प्रसुती, असे सांगत आहे. धक्कादायक म्हणजे, रुग्णांची संख्या जास्त असल्याने आम्ही तिला ‘फ्लोअर बेड’ म्हणजे, फरशीवर झोपण्यास सांगितले असा खुलासाही केला आहे. एकूणच मेडिकल प्रशासन दोषींना वाचविण्यचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे.तर बाळंतीणीचे पती श्रीकांत चतारे यांनी हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करीत, दोषींवर कारवाई करण्याची लेखी मागणी मंगळवारी अधिष्ठात्यांकडे केली.‘लोकमत’ने सुकेशनी श्रीकांत चतारे या महिलेला स्वत:च्या हाताने प्रसुती करावी लागली, हे वृत्त प्रसिद्ध करताच खळबळ उडाली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याची गंभीर दखल घेत वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना निवेदन दिले. महाजन यांनी तातडीने चार सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी स्थापन केली. यामुळे मेडिकल प्रशासन झालेला प्रकार लपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, चौकशी समितीचा अहवाल येण्यापूर्वीच असा प्रकार झालाच नसल्याचे सांगत असल्यानेही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.सुकेशन चतारे हिचे पती श्रीकांत चतारे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, वॉर्ड ३३ मध्ये भरती झाल्यावर पत्नीला शौचालयाजवळ बेड दिला. पण गादीवर टाकण्यासाठी बेडशिट दिली नाही. शौचालयाच्या दुर्गंधीत दिवस काढला. त्याच दिवशी रात्री २ वाजता प्रसव कळा सुरू झाल्या. तेथील डॉक्टरांनी पहिल्या मजल्यावर घेऊन जाण्यास सांगितले. मात्र, स्ट्रेचर किंवा व्हीलचेअर वा लिफ्टची कुठलीही सोय उपलब्ध करून दिली नाही. त्या अवघडलेल्या अवस्थेत तिच्या आईने तिला आधार देत दुसऱ्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर प्रसुती कक्षात आणले. रात्री ३ च्या सुमारास वेदनेने ती विव्हळत होती. त्यावेळी एक महिला डॉक्टर आत येऊन पत्नीच्या मांडीवर मारले. तूच तुझ्या हाताने ‘डिलिव्हरी’ कर, असे म्हणून निघून गेली.पत्नी वेदनेने ओरडत होती. पहाटे ५ वाजताच्या सुमारास प्रसूती कक्षातच प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेने सांगितले की, तुझे बाळ बाहेर आले. बाळाचे खांदे आत अडकले होते. पत्नीला असह्य वेदना होत होत्या. त्या महिलेने पत्नीला हाताने बाळ बाहेर खेचण्यास सांगितले. कुणी मदतीला येत नसल्याचे पाहत, पत्नीने तसा प्रयत्न केला. अर्धे बाळ बाहेरही आले होते. या झटापटीत हाताचे सलाईन निघाले. रक्त बाहेर येऊ लागले होते. या दरम्यान मोठमोठ्याने आरडाओरड झाल्यावरच एक महिला डॉक्टर आत आली. तिने छोटासा चिरा दिला. बाळ बाहेर आले. प्रसूतीनंतर पत्नीला नवजात शिशूसोबत फरशीवर झोपविले. डॉक्टरांनी वेळीच लक्ष दिले असते, तर हा प्रकार घडलाच नसता, तिलाच तिच्या हाताने प्रसूती करण्याची वेळ आली नसती, असेही तक्रारीत म्हटले आहे. दोषींवर कारवाई व्हावी आणि न्याय द्यावा, अशी मागणी चतारे यांनी केली.चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला नाही‘त्या’ प्रसूती घटनेवरून स्थापन करण्यात आलेल्या तीन सदस्यीय चौकशी समितीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. सुकेशनी चतारे हिचे पती श्रीकांत चतारे यांची लेखी तक्रार मिळाली आहे.डॉ. नरेश तिरपुडेप्रभारी, अधिष्ठाता, मेडिकल