योगेश पांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रत्यक्ष संशोधनात विद्यापीठ माघारले असले तरी अकल्पनीय जावईशोध लावण्याचे प्रताप येथे होताना दिसून येतात. देशाचे सहावे उपराष्ट्रपती व जगभरात कायदेतज्ज्ञ म्हणून ओळखल्या गेलेले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मोहम्मद हिदायतुल्लाह यांच्यावर नागपूर विद्यापीठात शिक्षणाचे संस्कार झाले. मात्र याच नागपूर विद्यापीठाने उपराष्ट्रपतीऐवजी त्यांना देशाचे माजी ‘उपाध्यक्ष’ ही एक नवीनच ओळख दिली आहे. नागपूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तसा स्पष्ट उल्लेख असून भाषातज्ज्ञांचा भरणा असताना अद्यापही ही बाब प्रशासनाच्या लक्षात का आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.नागपूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देशविदेशात आपल्या कर्तृत्वाचे झेंडे रोवणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा विशेष उल्लेख आहे. संकेतस्थळाच्या मराठी आवृत्तीमध्ये न्या.मोहम्मद हिदायतुल्लाह यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच माजी पंतप्रधान नरसिंहराव, माजी मंत्री डॉ.श्रीकांत जिचकार, जस्टीस चंद्रशेखर धर्माधिकारी, जागतिक कीर्तीचे संगणकशास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर इत्यादींचा प्रामुख्याने समावेश आहे. मात्र हिदायतुल्लाह यांनी भूषविलेले पदच विद्यापीठाने चुकविलेले आहे. भारतात देशाचा अध्यक्ष व उपाध्यक्ष नव्हे तर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही संविधानिक पदे आहेत. विद्यापीठाच्या विभागांमध्ये यावर शिकविण्यात येते. मात्र प्रत्यक्ष संकेतस्थळावर मात्र दिव्याखालीच अंधार असल्याचे चित्र आहे. न्या.हिदायतुल्लाह हे देशाचे सहावे उपराष्ट्रपती होते व सरन्यायाधीशपदाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. शिवाय १९६९ साली ३५ दिवस त्यांनी देशाच्या प्रभारी राष्ट्रपददेखील भूषविले होते. हिदायतुल्लाह यांनी नागपुरातील मॉरिस कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले होते. मात्र त्यांनी भूषविलेल्या पदांची योग्य माहितीदेखील विद्यापीठाकडे नसणे ही दुर्दैवी बाब आहे.विद्यापीठाकडे माहिती नाही का ?साधारणत: विद्यापीठातून शिकलेल्या व जगात आपल्या कर्तृत्वाची छाप पाडलेल्या विद्यार्थ्यांची माहिती विद्यापीठाकडे असणे अपेक्षित आहे. विद्यापीठाकडून भाषांतराची चूक असल्याचे दावे करण्यात येतील. मात्र देशात उपाध्यक्षपद नव्हे तर उपराष्ट्रपती हे पद आहे, याची माहिती शाळकरी विद्यार्थ्यांनादेखील असते. असा स्थितीत हिदायतुल्लाह यांचा उल्लेख माजी ‘उपाध्यक्ष’ करण्यात अला. इतक्या मोठ्या पदावरील व्यक्तीबाबत अचूक माहिती का देण्यात आली नाही, हा प्रश्नच आहे. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
म्हणे, हिदायतुल्ला होते भारताचे ‘उपाध्यक्ष’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 10:16 AM
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रत्यक्ष संशोधनात विद्यापीठ माघारले असले तरी अकल्पनीय जावईशोध लावण्याचे प्रताप येथे होताना दिसून येतात.
ठळक मुद्देनागपूर विद्यापीठाचा जावईशोध संकेतस्थळावर पाजळले ज्ञान