लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड/काटाेल : काटाेल व नरखेड तालुक्यात संत्रा व माेसंबी बागांचा सायला या किडीमुळे ग्रीनिंग या राेगाचा प्रादुर्भाव वाढत आहे, अशी माहिती सीसीआरआयचे फळबाग शास्त्रज्ञ डॉ. अंबादास हुच्चे व पीडीकेव्हीचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. प्रदीप दवणे यांनी संयुक्तरीत्या दिली. दाेन्ही तालुक्यात संत्रा व माेसंबीची माेठ्या प्रमाणात फळगळ हाेत असल्याने गुरुवारी (दि. २६) सीसीआरआय (सेंट्रल सिट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट) व पीडीकेव्ही (डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकाेला) यांच्या फळबाग व कीटकशास्त्रज्ञांनी दाेन्ही तालुक्यातील संत्रा व माेसंबीच्या बागांची पाहणी करीत शेतकऱ्यांना उपाययाेजना सुचविल्या.
यावेळी सीसीआरआयचे फळबाग शास्त्रज्ञ डॉ. अंबादास हुच्चे, डॉ. आशिष दास, डॉ. हरीश सवाई, पीडीकेव्हीचे सहयोगी अधिष्ठाता डाॅ. देवानंद पंचभाई, उद्यानविद्या विभागप्रमुख डॉ. रमाकांत गजभिये, प्रादेशिक फळसंशाेधन केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. प्रदीप दवणे, उद्यानविद्यावेत्ता डॉ. योगेश धार्मिक सहभागी झाले हाेते.
या शास्त्रज्ञांनी फळगळ हाेत असलेल्या काटाेल तालुक्यातील पारडी, ढवळापूर, खापरी (केणे), नायगाव (ठाकरे) तसेच नरखेड तालुक्यातील झाेलवाडी, उमठा या शिवारातील बागांची पाहणी करून शेतकऱ्यांना उपाययाेजनांबाबत मार्गदर्शन केले. या संयुक्त पाहणी दाैऱ्यात विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भाेसले, अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. योगिराज जुमडे, तालुका कृषी अधिकारी सुरेश कन्नाके यांच्यासह काटाेल, नरखेड व कळमेश्वर तालुक्यातील प्रमुख संत्रा व माेसंबी उत्पादक शेतकरी सहभागी झाले हाेते.
...
अंबियाबहाराचे फळ अन्नद्रव्य व्यवस्थापन
अंबियाबहाराच्या फळांवर अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यासाठी १५० ग्रॅम झिंक सल्फेट व फेरस सल्फेट, एक किलाे डीएपी प्रत्येक झाडास द्यावे, अशी सूचना कीटकशास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप दवणे यांनी केली. संत्रा व माेसंबीची फळगळ राेखण्यासाठी पावसाचा सलग तीन-चार दिवस खंड पडल्यास जीए-३ १.५ ग्राम, कॅल्शियम नायट्रेट १.५ किलो, १५ ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लिन १०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. १५ दिवसाने टू-फाेर-डी किंवा एनएए १.५ ग्रॅम, ३०० ग्रॅम, बोरिक ॲसिड, थायोफनेट मिथाईल/कार्बेंडाझिम १०० ग्रॅम, मोनोपोटॅशियम फॉस्फेट (००:५२:३४) १.५ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. सलग तीन-चार दिवस पाऊस लागून आल्यास झाडांवर ॲलिएट २.५ ग्रॅमची फवारणी करावी. गरज पडल्यास दुसरी फवारणी मेटालॅक्झील व मॅनकोझेब या बुरशीनाशकांची फवारणी करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
..........
हल्ली संत्रा व माेसंबीवर ग्रीनिंग राेग वाढत आहे. हा राेग सायला या किडीमुळे उद्भवताे. या किडीच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क किंवा तीन ग्रॅम थायमेथ्राेक्झाम १० लिटर पाण्यात मिसळून त्याची झाडांवर फवारणी करावी. जेणेकरून या कीड व रोगाचा बंदोबस्त करता येईल.
- डाॅ. प्रदीप दवणे, कीटकशास्त्रज्ञ,
प्रादेशिक फळ संशाेधन केंद्र, काटाेल.