निशांत वानखेडे
नागपूर : दुर्मीळ प्रजातीत गणला जाणारा खवले मांजर हा जगात सर्वांत जास्त तस्करी होणारा प्रथम क्रमांकाचा प्राणी आहे. जगात दर पाचव्या मिनिटाला एका खवले मांजराची तस्करी होत असल्याची धक्कादायक माहिती ‘इंटरनॅशनल युनियन फाॅर काॅन्झर्वेशन ऑफ नेचर’ (आययूसीएन) ने त्यांच्या वेबसाइटवर दिली आहे. म्हणजेच दर पाच मिनिटांनी जंगलातून एक खवले मांजर शिकार किंवा तस्करीसाठी पकडले जाते.
जगात खवले मांजराच्या एकूण आठ प्रजाती आढळतात. त्यापैकी चार या आफ्रिकेत आणि चार या आशियामध्ये आढळतात. यामध्ये फिलीपिन्स पॅंगोलिन, सुंदा पॅंगोलिन, चाननीज पॅंगोलिन, टेमिन्कची पॅंगोलिन, इंडियन पॅंगोलिन, वाईट बेलिड पॅंगोलिन, जायन्ट गाऊंड पॅंगोलिन, ब्लॅक बेलिड पॅंगोलिन या प्रजातींचा समावेश आहे. भारतात हिमालय आणि ईशान्य भारताच्या भागात चायनीज पॅंगाेलिन आढळून येते, तर इंडियन पॅंगोलिन ही प्रजात सर्वत्र आढळते. भारतात माेठ्या प्रमाणात खवले मांजराची शिकार हाेते, पण या प्राण्याबाबत फार जागृती नसल्याने एखादी कारवाऊ झाल्याशिवाय याबाबत फारशी चर्चा हाेत नाही. विशेष म्हणजे देशात वाघांची संख्या माहिती आहे, त्याप्रमाणे इतर प्राण्यांबाबत गणना हाेतच नाही. काेकणात खवले मांजर संवर्धनासाठी कार्य करणारे भाऊ काटधरे यांच्या मते, भारतात कधीही खवले मांजराचे सर्वेक्षण किंवा गणना झाली नाही. त्यामुळे किती आहेत, किती शिकार हाेते किंवा झाली किंवा किती प्रमाणात तस्करी हाेते, याबाबत निश्चित सांगता येणार नाही. अशाप्रकारे डेटा उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध देशांतील कारवाईच्या आधारे प्रमाण काढून आययुसीएनने तस्करीचे प्रमाण सादर केले असेल, पण भारतात याबाबत निश्चित आकडा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
म्यानमारमार्गे हाेते तस्करी
जाणकारांच्या मते, भारतात माेठ्या प्रमाणात खवले मांजराची तस्करी हाेते व ते म्यानमारमार्गे चीनला पाेहोचविले जातात. ईशान्य भारतातून चायनीच खवले मांजराची तस्करी उत्तर पूर्व राज्यातून हाेते. याशिवाय नेपाळ मार्गानेही मांजराचे मांस व खवल्यांची तस्करी केली जाते. चीन व आसपासच्या देशात त्याचे मांस आवडीने खाल्ले जाते. शिवाय त्यांच्या खवल्यांद्वारे औषधी, दागिने व महागड्या वस्तू तयार केल्या जातात. त्यामुळे त्याला माेठी मागणी आहे.
राज्यात गेल्यावर्षी १५ कारवाया
वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युराे (डब्ल्यूसीसीबी) चे आदिमलाइ यांनी सांगितले, गेल्यावर्षी महाराष्ट्रात १२ ते १५ ठिकाणी खवले मांजर पकडणाऱ्यांवर कारवाया झाल्या. यामध्ये नागपूरच्या खापा, कळमेश्वर, नांदेड, दापाेली, पुणे आदींचा उल्लेख त्यांनी केला. त्यातून २० ते २५ खवले मांजरांना रेस्क्यू करण्यात आले. मलकापूरमध्ये एका आराेपीकडून १०० खवले मिळविण्यात आले हाेते. २०१५-१६ मध्ये रत्नागिरीकडे एकाच वेळी ६४ किलाे खवले मांजर पकडले हाेते. मात्र, यामध्ये स्थानिक लाेकांचाच सहभाग आढळून आला. आंतरराष्ट्रीय टाेळीचे पुरावे सापडले नाहीत. तस्करी हाेत असेल, पण अलीकडच्या काळात देशात तस्करीचा कुठलाही रिपाेर्ट नसल्याचे आदिमलाइ यांनी स्पष्ट केले.