लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपली बस प्रवास भाड्याचा घोटाळा करून महापालिकेला प्रचंड आर्थिक फटका देणा-या टोळीचे कटकारस्थान उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे याच्या निर्देशावरून आपली बसच्या तिकीट तपासणीसांनी (टीसी) कामठी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी शनिवारी सकाळी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने संबंधित वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.पोलिसांच्या प्राथमिक तपासात या टोळीतील प्रेम मिश्रा, बिलाल, मुन्ना, एमएच ३१/ बीएम ७४३८ क्रमांकाच्या बसचा चालक, ८१४९९५५९०५ आणि ९७६५९९७४९० क्रमांकाचे मोबाईलधारक या प्रकरणात आरोपी बनविण्यात आले आहे.आपली बसचे टीसी निलकंठ कंचनलाल प्रजापती (वय ३२) यांनी कामठी पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, आपली बसवर वाहक, चालक म्हणून काम करणारे काही जण प्रवाशांकडून तिकीटाचे पैसे घेतात. मात्र, त्यांना तिकीट न देता आणि ही रक्कम आपली बसच्या खात्यात अर्थात महापालिकेकडे जमा न करता ही टोळी त्या रकमेचा अपहार करते. गेल्या अनेक महिन्यांपासून हा गोरखधंदा सुरू असून, या वाहक-चालकांमागे एक मोठी टोळीच कार्यरत आहे. या टोळीने त्यातून महापालिकेला मोठा आर्थिक फटका दिलेला आहे. तो लक्षात आल्यामुळे टीसी बसची (विनातिकिट प्रवासी) तपासणी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, या टोळीतील आरोपी टीसींसोबत वाद घालून त्यांना मारहाण करून, त्यांचा अपमाण करून त्यांच्या कामात अडथळा निर्माण करतात. ३ मार्चला सकाळी अशाच प्रकारे तपासणी पथकातील भारत तुळशीराम चव्हाण, राहुल अशोकराव येवले, वाहनचालक संतोष दिनेश सहारे (वय २९) यांच्या भरारी पथकाने इंदोरा चौकातून आपली बस तपासणीची कारवाई सुरू केली. एमएच ३१ / बीएम ७४३८ चा स्प्लेंडर चालक तरुण या भरारी पथकाच्या वाहनासमोर वारंवार वाहन आडवे करून कारवाईत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागला. इंदोरा चौक, वैशालीनगरात असा प्रकार केल्यानंतर भरारी पथकाचे वाहन एसबीआयसमोरच्या खाली जागेत उभे केले असता आरोपी स्प्लेंडर चालकाने त्यांच्या वाहनासमोर आपली मोटरसायकल आडवी केली.यापूर्वी भरारी पथकातील कर्मचा-यांना मारहाण झाल्यामुळे चव्हाण, येवले, सहारेचे पथक घाबरले. त्यांनी कामठी ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी लगेच त्या तरुणाला पकडून ठाण्यात आणले.प्राथमिक चौकशीनंतर आपली बसच्या प्रवासी भाड्याचा घोटाळा करून महापालिकेला कोट्यवधींचा फटका देणा-या टोळीतील तो तरुण सदस्य असल्याचे स्पष्ट झाले. या टोळीचा म्होरक्या प्रेम मिश्रा असून बिलाल, मुन्ना, एमएच ३१/ बीएम ७४३८ क्रमांकाच्या बसचा चालक, ८१४९९५५९०५ आणि ९७६५९९७४९० क्रमांकाचे मोबाईलधारक या टोळीचे सदस्य असल्याचेही प्राथमिक चौकशीत उघड झाले.मुंढेंनी केली पोलीस आयुक्तांशी चर्चाहा सर्व गैरप्रकार महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कानावर गेला. त्यांनी त्याची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याशी चर्चा केली. आपली बस सर्वसाधारण नागरिकांच्या सेवेसाठी चालविली जाते. ही टोळी अशाच प्रकारे कटकारस्थान करून आर्थिक अपहार करीत असल्याने ती तोट्यात चालते. असेच सुरू राहिले तर बस बंद करावी लागेल, त्याचा फटका सर्वसाधारण नागरिकांना बसेल, हे देखिल या चर्चेत सांगण्यात आले. महापालिका आयुक्त मुंढे आणि पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी त्याची गंभीर दखल घेतली. या पार्श्वभूमीवर, आपली बसचे टीसी प्रजापती यांनी शुक्रवारी रात्री कामठी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी कलम ३४१, १२० (ब, २) तसेच ५०६ अन्वये गुन्ह्याची नोंद घेतली. पुढील तपास सुरू आहे.टोळीत खळबळगेल्या अनेक वर्षांपासून प्रवासी भाड्याचा हा घोटाळा बिनबोभाट सुरू आहे. हा घोटाळा करणा-या टोळीत काही बसचे चालक, वाहकही सहभागी आहेत. त्यांची गुंडगिरीही सर्वत्र चर्चेचा विषय होती. मात्र, संबंधित कर्मचारी, अधिकारी त्याबाबत बोलत नव्हते. आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने आणि खुद्द महापालिका आयुक्तांनीच त्याकडे लक्ष दिल्याने या टोळीत प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.