नागपूर : गुंतवणुकीचे आमिष देऊन फसवणूक करण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला बिल्डर विजय शेळके सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून पोलिसांना चकमा देऊन फरार झाला. रविवारी सकाळी झालेल्या घटनेमुळे पोलिसात खळबळ उडाली. या प्रकरणात दोषी पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
त्रिमूर्तीनगर येथील रहिवासी विजय शेळके, त्याचा भाऊ आणि साथीदारांना ऑगस्टमध्ये आर्थिक शाखेने अटक केली होती. शेळकेची गोविंदा डेव्हलपर्स ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर आणि सुपिरिअर अॅग्रो फार्मिंग ॲन्ड कल्टीव्हेटर्स नावाची संस्था होती. शेळकेने नागरिकांना जमीन आणि अॅलोव्हेराच्या प्लान्टमध्ये अधिक फायदा मिळवून देण्याची बतावणी करून गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्याचा तपास आर्थिक शाखा करीत आहे. सोनेगाव ठाण्यात फसवणुकीचा तसेच एमपीआयडीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस कोठडी संपल्यानंतर शेळके तुरुंगात होता. ७ डिसेंबरला हृदयाचा आजार असल्यामुळे त्यास सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. शेळकेच्या निगराणीसाठी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले होते. रविवारी सकाळी ५.३० वाजता शेळकेने पोलिसांना लघुशंकेसाठी जायचे असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याची हातकडी उघडली. लघुशंकेवरून आल्यानंतर शेळके पोलिसांना चकमा देऊन फरार झाला. त्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याचा शोध घेतला. परंतु अंधार असल्यामुळे त्याचा तपास लागू शकला नाही. पोलिसांनी शेळकेशी निगडित नागरिकांची धरपकड केली आहे. जाणकारांच्या मदतीने शेळके फरार झाल्याची त्यांना शंका आहे. या घटनेला पोलीस आयुक्तांनी गंभीरपणे घेऊन दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. आरोपी रुग्णालयातून पळून गेल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. त्यामुळे रुग्णालयात आरोपींसाठी वेगळा वॉर्ड तयार करण्याची योजना आहे. याबाबत तुरुंग अधीक्षक आणि डॉक्टरांशी चर्चा करण्यात आली आहे. कोरोनामुळे हे काम प्रलंबित आहे.
..................