खासगी भूखंड बनावट दस्तावेज करून विकण्याचे प्रकरणनागपूर : सरकारी जमिनी आणि दुसऱ्याचे खासगी भूखंड स्वत:च्या मालकीचे असल्याचे बनावट दस्तावेज तयार करून विकणाऱ्या एका भूखंड घोटाळेबाजाचा जामीन अर्ज तदर्थ न्यायालयाचे सहायक सत्र न्यायाधीश डी.डी. खोचे यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. शहानवाज खान ईस्माइल खान (४२), असे आरोपीचे नाव असून तो यशोदरानगर संजीवनी क्वॉर्टर येथील रहिवासी आहे. शेख ईस्माइल शेख रशीद (५१) रा. मोमीनपुरा, असे या प्रकरणातील फिर्यादीचे नाव आहे. प्रकरण असे की, वांजरी सर्व्हे क्रमांक डी आणि ई हे दोन भूखंड मोरबाजी भाकरू देवगडे यांच्या मूळ मालकीचे होते. या भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ आराजी ८५०५ चौरस फूट आहे. हे भूखंड देवगडे यांनी १६ जून १९८४ रोजी शांतीनगर येथील तुलसीदास रिचूमल चेलानी यांना रजिस्टर्ड विक्रीपत्राद्वारे विकले होते. पुढे चेलानी यांचा मृत्यू झाल्याने वारसदार ताराचंद आणि इतरांनी या भूखंडांचा आममुख्त्यारनामा शेख ईस्माइल शेख रशीद यांना करून दिला होता. शहानवाज खान याने या भूखंडांचे बनावट दस्तावेज तयार करून ते खैरुल बशर आणि इतर आठ जणांना चार लाख रुपयांत विकून त्यांची आणि फिर्यादीची फसवणूक केली. यशोदरानगर पोलिसांनी भादंविच्या ४२०, ४६८, ४७१, ४४७, ५०६ ब कलमान्वये गुन्हा दाखल करून शहानवाज खान याला अटक केली होती. तो अद्याप कारागृहात आहे. त्याने जामीन अर्ज दाखल केला असता फसवणुकीच्या गुन्ह्याचा अभिलेख लक्षात घेऊन न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अजय माहुरकर यांनी काम पाहिले. या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बघेले हे आहेत. (प्रतिनिधी)
घोटाळेबाजाचा जामीन फेटाळला
By admin | Published: April 15, 2016 3:09 AM