लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - महापालिकेच्या गांधीबाग झोन (क्रमांक ६) मध्ये मालमत्ता कर विभागातील घोटाळा उघड झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी कर संग्राहकासह तिघांविरुद्ध कोतावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
महापालिकेचे सहायक कर अधीक्षक पांडुरंग वामनराव शिंदे (वय ५७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी कर संग्राहक संजय भपुदराव खडगी (रा. मस्कासाथ) याने ८ ऑक्टोबर २०२० च्या सायंकाळी ५ वाजता संगणकात मालमत्ता कराची बेकायदेशीर फेरफार करून घनशाम हजारीलाल शर्मा (रा. धंतोली) तसेच शिवाजी सीताराम शर्मा यांच्याकडे कराचे २ लाख ३० हजार ४३९ रुपये असताना केवळ ७१,८१५ रुपयांची नोंद केली. चार महिन्यांनंतर ही बनवाबनवी उघड झाल्याने एकच खळबळ उडाली. शिंदे यांनी या संबंधाने तक्रार दिल्यानंतर रविवारी कोतवाली पोलिसांनी खडगी तसेच घनशाम आणि शिवाजी शर्मा या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
अनेक प्रकरणे अंधारात
उघडकीस आलेले हे केवळ एक प्रकरण असले तरी अशा प्रकारची कर घोटाळ्याची अनेक प्रकरणे अंधारात असल्याची जोरदार चर्चा संबंधित वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे ते उजेडात आल्यास अनेकांची खुर्ची धोक्यात येऊ शकते.