सुमेध वाघमारे
नागपूर : राज्य कामगार विमा सोसायटीच्या रुग्णालयात (इएसआयएस) उपचाराची सोय असताना, येथील रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार करून जास्तीचे बिल ‘इएसआयएस’च्या माथी मारून मलिदा खाण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लाखो रुपयांच्या या घोटाळ्यात दोषी डॉक्टरला काढून टाकण्यात आले. याची सखोल चौकशी झाल्यास अनेक मोठे मासे अडकण्याची शक्यता आहे.
कामगार रुग्णालयावर ३ लाख ६३ हजार कामगार व ११ लाख ३३ हजार ७७५ कुटुंबीयांच्या आरोग्याची जबाबदारी आहे. यासाठी कामगाराच्या वेतनातून दरवर्षाला कोट्यवधी रुपये रुग्णालयाला मिळतात. याच पैशांतून रुग्णालयातील डॉक्टरांपासून ते कर्मचाऱ्यांचे पगार होतात. परंतु रुग्णालयातील सोयी केवळ नावालाच आहेत. त्यामुळे काही खासगी रुग्णालयांची मदत घेतली जाते. यावर मोठा निधी खर्च होत असल्याने त्याचाच फायदा घेऊन एका डॉक्टरने आर्थिक घोटाळा केल्याचे पुढे आले आहे.
असा झाला घोटाळा
जवळपास दीड वर्षांपूर्वी कंत्राटी तत्त्वावर सर्जन म्हणून कामगार रुग्णालयात रुजू झालेला हा डॉक्टर एका खासगी हॉस्पिटलमध्ये सर्जन म्हणूनही कार्यरत आहे. सूत्रानूसार, कामगार रुग्णालयात शस्त्रक्रियेची सोय असताना ते नसल्याचे सांगून संबंधित खासगी हॉस्पिटलमध्ये पळवून न्यायचा. काही रुग्णांच्या कागदपत्रावर गरज नसताना गंभीर शस्त्रक्रिया दाखवून खासगी हॉस्पिटलमध्ये ‘ ‘ऑपरेट’ केले जात होते.
प्रत्येक शस्त्रक्रियेमागे मिळायचे ३० हजार रुपये
प्राप्त माहितीनुसार, सामान्य शस्त्रक्रिया असली तरी त्याला गंभीर दाखवून हा डॉक्टर प्रत्येक प्रकरणामागे जवळपास ३० हजार रुपये अतिरिक्त खर्च दाखवायचा. मागील काही दिवसात असे २५ वर प्रकरण पुढे आले. याची चर्चा होऊ लागल्याने वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीना देशमुख यांनी चौकशी समिती स्थापन केली. त्यात घोटाळा झाल्याचे सिद्ध झाले. जवळपास सात ते आठ लाख रुपयांचा हा घोटाळा असल्याचे सांगण्यात येते. मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी केल्यास जुनी सर्व प्रकरणे पुढे येऊन कोट्यवधी रुपयांचा घोटाळा समोर येण्याची शक्यता अहे.
वरिष्ठांच्या सुचनेनुसार पुढील कारवाई
संबंधित डॉक्टरने केलेल्या गैरकृत्याची माहिती कामगार आयुक्त, डायरेक्टर मेडिसिन कामगार आयुक्त कार्यालय व ‘इएसआयएस कॉर्पाेरेशन’ यांना पाठविली आहे. त्यांच्याकडून पुढील सूचना न आल्याने पोलिसांकडे तक्रार करण्यात आलेली नाही. वरिष्ठांच्या सूचनेनुसार कारवाई केली जाईल.
-डॉ. मीना देशमुख, वैद्यकीय अधीक्षक, राज्य कामगार विमा सोसायटी