नागपूर : वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या उमरेड क्षेत्रांतर्गत कोळसा वाहतुकीच्या निविदा प्रक्रियेत घोळ झाला आहे. एका विशिष्ट्य कंत्राटदाराला निविदा मिळावी यासाठी अटीमध्ये बदल करण्यात आला. यानंतर कंत्राटदाराने वेळेत काम केले नसूनही पुन्हा त्याच कंपनीला निविदा मिळावी यासाठी अधिकारी प्रयत्न करीत आहेत. संबंधित कंत्राटदार कंपनीला निविदा देताना तब्बल २८ कोटी रुपयांचे नुकसान वेकोलिला होत आहे, असा आरोप रामटेकचे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे.
तुमाने म्हणाले, वेकोलिच्या उमरेड क्षेत्रातर्गत गोकुळ खदानीत कोळसा वाहतुकीची निविदा काढण्यात आली होती. त्यावेळी निविदा काढल्यावर त्यात सुधारणा करण्यात आली. यामुळे निविदा सादर करणाऱ्यांनी तोटा होण्याच्या शक्यतेमुळे निविदेत स्वारस्य दाखविले नाही. परिणामी ही निविदा अवनीश लॉजिस्टिक प्रा. लि. या कंपनीला मिळाली. कंपनीला वेळेत काम करायचे होते. मात्र कंत्राटदाराने वेळेत काम पूर्ण न करता त्यासाठी अधीकचा दीड वर्षांचा कालवधी लावला. विशेष म्हणजे वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी यास मान्यता दिली. यानंतरही निविदा काढण्यात उशीर केला जात आहे. दोन वेळा निविदेला मुदतवाढ देण्यात आली. ठेकेदाराच्या चुकीमुळे दीड वर्षांपूर्वी निविदा निघाली असती तर कमीत कमी सरकारच्या २८ कोटी रुपयांची बचत झाली असती. आताही वेकोलिचे अधिकारी त्याच कंपनीला निविदा मिळावी यासाठी आग्रही आहेत. सध्याची निविदा पूर्ण होण्यासाठी शार्ट टेंडर काढणे आवश्यक झाले होते. मात्र ते काढण्यात आले नाही जर शॉर्ट टेंडर काढण्यात आले असते तर वेकिलिला २८ कोटी रुपयांचा फायदा झाला असता. मात्र तसे करण्यात येत नसल्यामुळे यात भ्रष्टाचार होत असल्याचे स्पष्ट होत आहे, असा आरोप तुमाने यांनी केला आहे.
वेकोलिच्या दक्षता विभागाला पाठविले पत्र
- या घोटाळ्याबाबतची माहिती वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना व वेकोलिच्या दक्षता विभागाला पत्राद्वारे दिली असल्याचे तुमाने यांनी सांगितले. या निविदा प्रक्रियेत कंत्राटदाराने ३७.५ किमी अंतर नमूद केले आहे. प्रत्यक्षात त्याहून कमी अंतर आहे. २० किमी अंतराहून अधिक वाहतूक असल्यास त्याचा भार महाजेनेको वेकोलिला करते. यासोबत १० टक्के अतिरिक्त सर्विस चार्जेस घेतले जातात. वेकोलिमध्ये अशा प्रकारचे घोटाळे होत असल्याने महाजेनेकोची वीज महाग होत आहे, असा आरोपही तुमाने यांनी केला.