लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : औषध पुरवठ्याची जबाबदारी देण्यात आलेल्या ‘हाफकीन’ महामंडळाकडून दोन वर्षे होत असताना अद्यापही औषधांचा पुरवठा सुरळीत झालेला नाही. परिणामी, मेयो, मेडिकलसोबतच आता शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातही औषधांचा तुटवडा पडला आहे. याचा फटका रुग्णांना बसत असून रुग्णालयातील रुग्णांची संख्या रोडवली आहे.‘आयुर्वेदा’च्या प्रचार व प्रसारामुळे आयुर्वेद रुग्णालयाकडे लोकांचा कल वाढला आहे. मात्र, रुग्णालयात औषधेच नाही. डॉक्टर उपचार तर करतात. मात्र, औषधे मिळत नसल्यामुळे त्यांना आल्यापावली परत जावे लागते. त्रिफळा चूर्ण, सिंहनाथ, गुगुळ, गोक्षूर गुगुळ, शतावरी, अश्वगंधा, हिंगुष्टाक, अविपत्ती, करचूर्ण आदी महत्त्वाच्या औषधांचा तुटवडा आहे. रुग्णालयाला दरवर्षी साधारणत: ५० लाखांची औषधी लागते. राज्य शासनाने औषधे व यंत्रे पुरवठ्यासाठी नेमलेल्या ‘हाफकीन’ महामंडळाकडे रुग्णालय प्रशासनाने औषधांसाठी निधी जमा केला. मात्र, ‘हाफकीन’कडून औषधांच्या पुरवठ्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. या संदर्भात रुग्णालय प्रशासनाने वारंवार पाठपुरावा केला, परंतु महामंडळाने आणखी १५ लाख रुपये जमा करण्याचे सांगितले. आधीच दीड लाखांची औषधी मिळाली नाही. यामुळे हा निधी जमा करूनही औषध मिळेल का, यावर रुग्णालय प्रशासन शंका उपस्थित करीत आहे.अधिष्ठात्यांना तीन लाखापर्यंतचे अधिकारअधिष्ठात्यांना तीन लाखांपर्यंतचे अधिकार आहेत. तीन लाखांवरील खर्च ‘हाफकीन’द्वारे, तर तीन लाखांखालील खर्च ‘रसशाळे’त करता येतो. परंतु, रसशाळेत औषधेच नसल्यामुळे प्रशासन अडचणीत सापडले आहे. हाफकीनकडून होणारी चालढकल व बेजबाबदारपणाचा फटका मात्र गरीब व सर्वसामान्य रुग्णांना बसत आहे.
नागपूरच्या आयुर्वेद रुग्णालयातही औषधांचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 10:16 PM
औषध पुरवठ्याची जबाबदारी देण्यात आलेल्या ‘हाफकीन’ महामंडळाकडून दोन वर्षे होत असताना अद्यापही औषधांचा पुरवठा सुरळीत झालेला नाही. परिणामी, मेयो, मेडिकलसोबतच आता शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातही औषधांचा तुटवडा पडला आहे. याचा फटका रुग्णांना बसत असून रुग्णालयातील रुग्णांची संख्या रोडवली आहे.
ठळक मुद्देरुग्णसंख्या रोडावली : ‘हाफकीन’कडून औषधांची प्रतीक्षा